नगराध्यक्ष राजेश बेंडल, आरक्षणाच्या लढाईत राजकीय आरोप नकोत
गुहागर, ता. 8 : भाजप आरोप करत असलेली जमीन माझ्या मालकीची नाही ती बेंडल कुटुंबाची सामाईक जमीन असून त्यात माझी वहीवाटही नाही. अशी माहिती नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिली आहे. भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे यांनी मंगळवारी (ता.7) गुहागर मध्ये भाजप कार्यकत्यांची बैठक घेतली. त्यावेळी नगराध्यक्षांच्या जमिनीवरचे आरक्षण उठते मग सामान्यांच्या का नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. Guhagar Development Plan
गुहागर वरचापाटकडे जाताना साकवी परिसरातील दामले, शेटे व बेंडल यांच्या शेत जमिनीवर इलेक्ट्रिक व्हेईकल पावर पॉइंटचे आरक्षण पडले होते. मात्र बेंडल यांच्या जमिनीवरील आरक्षण नंतर प्रसिद्ध झालेल्या प्रारुप विकास आराखड्यात नाही. त्याचबरोबर गुहागर भंडारवाडी येथील आरक्षण क्रमांक 3 आणि कीर्तन वाडी मधील आरक्षण क्रमांक 18 ही देखील आधीचा विकास आराखडा व प्रत्यक्ष प्रसिद्ध केलेल्या आराखड्यात बदलण्यात आली आहेत. सध्या याचीच चर्चा गुहागर मध्ये सुरू आहे. बेंडल यांच्या जमिनीवरील हलविण्यात आलेल्या आरक्षणामुळे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांना लक्ष्य केले जात आहे. त्यातच भाजपच्या जिल्हा कार्याध्यक्षांनी जाहीरपणे आरोप केला. त्यामुळे राजेश बेंडल यांनी आज खुलासा केला. Guhagar Development Plan


नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, मुळात ज्या जमिनीवर आरक्षण पडले होते आणि नंतर जे आरक्षण हटले, त्यामध्ये माझा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हात नाही. मुळात सदर जमीन ही बेंडल कुटुंबियांची वडिलोपार्जित, सामायिक जमीन आहे. या जमिनीमध्ये माझ्या चुलत्यांची वहिवाट आहे. या जमिनीत माझी वहिवाट देखील नाही. उलट पक्षी सदरचे इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचे संपूर्ण आरक्षण उठवावे. असा ठराव नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत आम्ही केला आहे. जर बेंडल यांच्या जमिनीवरील आरक्षण उठले होते तर असा ठराव नगरपंचायतीत करण्याची गरजच नव्हती. त्यामुळे नगराध्यक्ष म्हणून माझ्यावर होणारे आरोप निराधार आहेत. मी आजही गुहागरमधील सर्वसामान्य जनतेच्या विकास आराखडा व्हावा यासाठी लढत आहे. शहरात पिढ्यानपिढ्या वास्तव्य करणाऱ्या जनतेच्या घरादारांवर नांगर फिरवून विकास करण्याला माझा सुरवातीपासून विरोध होता. तेव्हा शहर विकास आराखड्याला विरोध करताना राजकीय आरोप करून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे काम कोणीही करू नये. त्याऐवजी आज सुरू असलेली लढाई सर्वांनी मिळून लढुया. नगराध्यक्ष म्हणून मी सर्व गुहागरवासीयांसोबत आहे. असे आवाहन राजेश बेंडल यांनी केले. Guhagar Development Plan