ओबीसी मतांचा प्रभाव मावळला, राजकीय वाटचाल विचार करायला लावणारी
गुहागर, ता. 28 : गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांचे यावेळच्या निवडणुकीत मोठे मताधिक्य घटल्याने त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे. ज्या ओबीसी मतांनी जाधव यांना यापूर्वी तारले त्याच मतांमध्ये यावेळी फूट पडल्याचे बोलले जात आहे. मागील तीन निवडणुकांचे मताधिक्य पाहता यावेळी अगदीच काठावर पास झालेल्या जाधव यांना आपली भविष्यातील राजकीय वाटचाल विचार करायला लावणारी ठरली आहे. Guhagar Assembly Constituency
रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच ओबीसी समाजाला गुहागर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात शिवसेना शिंदे गटाने वाहवा मिळवली. त्यामुळे ओबीसी समाजात एक सकारात्मक विचार पोहचविण्यात शिंदे गटाचे नेते उदय सामंत यशस्वी ठरले होते. स्वतः त्यांनी या उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी घेऊन त्यादृष्टीने फिल्डींग लावली. गुहागरची जागा महायुतीमधील भाजपला न मिळाल्याने त्यांची काहीशी नाराजी होती. ही नाराजी जाधव यांना पोषक ठरेल असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भाजपने सबुरीने घेत वरिष्ठांशी चर्चा झाल्यावर महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे मान्य करुन त्यांच्या विजयासाठी कंबर कसली. कोणत्याही स्थितीत यावेळी भास्कर जाधव यांच्या विजयाचा वारु आपण रोखायचा असा चंग बांधला गेला आणि त्यानुसार रणनिती आखण्यात आली होती. Guhagar Assembly Constituency
वास्तविक गुहागर मतदारसंघात शिंदे गटाचे कार्यकर्ते बोटावर मोजण्याइतपतच आहेत. त्यांच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबविणे शक्यच नव्हते. मात्र, भारतीय जनता पार्टीने घेतलेली मेहनत शिंदे गटाच्या कामी आली आणि त्यांनी आपले कायम असलेले बूथ उमेदवाराच्या पाठिशी उभे केले. शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आ. रवींद्र फाटक आणि राजेश मोरे हे येथे तळ ठोकून होते. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुहागरमध्ये झालेली सभा भास्कर जाधवांसाठी चिंतनशील होती. मात्र, मतदानाच्या दोन दिवस अगोदर भास्कर जाधव यांनी मतदारसंघातील दोन गटांची जाहीर सभा घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन केले. या प्रचंड गर्दीने जाधव यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याचे यावेळी जाहीर झाले होते. यावेळी ५० हजाराचे मताधिक्य मिळवू असा निर्धारही करण्यात आला होता. मात्र, जाधव यांना ५ हजाराचे मताधिक्यही मिळवता आले नाही. त्यांचा विजय झाला असला तरी घटलेल्या मताधिक्याचा पराभव त्यांना जिव्हारी लागला. गुहागर तालुक्यात आ. जाधव यांच्या पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा परिषद गटामध्येही राजेश बेंडल यांना जास्त मतदान झाल्याने आगामी निवडणुकामध्ये आ. जाधवांना डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. Guhagar Assembly Constituency
आपल्या शेवटच्या या प्रचारसभेत भास्कर जाधव यांनी विरोधकांचा समाचार घेतलाच. शिवाय काही ओबीसी समाजाचे इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर घेतलेले तोंडसुख त्यांना कुठेतरी विचार करायला लावणारे ठरले आहे. चाकरमान्यांची मतेही काही प्रमाणात महायुतीला गेली असल्याची चर्चा होती. त्यामुळे घटलेले मताधिक्य जाधव यांची भविष्यातील राजकीय अडचण वाढवणारी ठरली आहे. Guhagar Assembly Constituency