नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करावा; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचे आवाहन
रत्नागिरी, ता. 07 : अवयवदानामुळे गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळू शकते. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे तब्बल ८ लोकांना जीवनदान मिळू शकते, त्यामुळे समाजात अवयवदानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे ही काळाची मोठी गरज आहे. या अनुषंगाने सर्व नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करावा, तसेच जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनाने अवयवदानासाठी रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले. Giving life through organ donation
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात ३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘अंगदान (अवयवदान) जीवन संजीवनी अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करणे, गैरसमज दूर करणे आणि त्यांना अवयवदानासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने गुरुवार, दि. ६ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत एका विशेष ‘अवयवदान जनजागृती रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. Giving life through organ donation
ही जनजागृती रॅली जिल्हा रुग्णालय येथून सुरू होऊन आठवडाबाजार मार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे आणि एनसीडी विभागाचे प्रमुख डॉ. उत्तमराव कांबळे यांनी उपस्थितांना अवयवदाना विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवयवदान करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. Giving life through organ donation
या रॅलीमध्ये आरोग्य विभागातील अनेक प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये डॉ. भास्कर जगताप (जिल्हा शल्यचिकित्सक), डॉ. कुमरे (अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक), डॉ. अंकुण शिरसाट (निवासी वैद्यकीय अधिकारी), डॉ. उत्तमराव कांबळे (एनसीडी विभाग प्रमुख), डॉ. सुनिल डोकळे (नेत्रशल्यचिकित्सक) यांच्यासह शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानामुळे जिल्ह्यात अवयवदानाबाबत मोठी जागृती निर्माण होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. Giving life through organ donation