तृप्ती नगर अडूर उपविजेता; सोहम कनगुटकर सर्वोत्कृष्ट खेळाडू
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील अडूर येथे तृप्ती नगर क्रिडा मंडळ आयोजित कै. निखिल संतोष नार्वेकर स्मृती चषक कबड्डी स्पर्धेत फ्रेंड सर्कल खालचापाट संघाने तृप्ती नगर अडूर संघावर मात करत अंतिम विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. Friend Circle Winner in Kabaddi Tournament at Adur
दि. १९ व २० जानेवारी या कालावधीत झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पहिल्या सेमी फायनल मध्ये फ्रेंड सर्कल खालचापाट संघाने श्री राम दत्त सेवा आरे संघाचा केतन पावसकर व सुमित आरेकर यांच्या आक्रमक चढाई आणि सर्वेश आरेकरच्या पकडीच्या जोरावर १० गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या सेमी फायनल मध्ये यजमान तृप्ती नगर अडूर संघाने सिद्धेश्वर वेलदूर संघाचा ८ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात फ्रेंड सर्कल संघाने सोहम कनगुटकर आणि अनिकेत भोसले यांच्या अनुभवाच्या जोरावर सुरवातीपासून आघाडी घेत तृप्ती नगर अडूर संघाचा ५ गुणांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. Friend Circle Winner in Kabaddi Tournament at Adur


विजेत्या फ्रेंड सर्कल संघाला ११ हजार १११/- आणि चषक, उपविजेत्या तृप्ती नगर अडूर संघाला ७ हजार ७७७/- आणि चषक, तसेच तृतीय क्रमांक श्री राम दत्त सेवा आरे संघाला आणि चतुर्थ क्रमांक सिद्धेश्वर वेलदूर चषक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून सोहम कनगुटकर, चढाईकार सुमित आरेकर, उत्कृष्ट पकड तेजस नार्वेकर, अंतिम सामन्यातील सामनावीर अनिकेत भोसले यांची निवड करून त्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी तृप्ती नगर क्रिडा मंडळ अडूरचे अध्यक्ष श्री. संतोष दसम आणि मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. स्पर्धेचे समालोचन श्री. कैलास पिळनकर, श्री. दिपक देवकर, श्री. सुयोग आरेकर यांनी केले. Friend Circle Winner in Kabaddi Tournament at Adur