१५ ऑगस्ट रोजी; दिपक परचुरे व ग्रामस्थांचा इशारा
गुहागर, ता. 03 : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे झीरो पासून प्रलंबीत राहीलेल्या कामाच्या पार्श्वभूमिवर अजूनही कोणतीच हालचाल न झाल्याने पुन्हा १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिना दिवशी दिपक परचुरे व ग्रामस्थांनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला आहे. Fasting again for National Highway
गुहागर शहरातील झीरो पासून सुरू होणारा गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले तीन वर्षे रखडले आहे. आतापर्यंत भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया न राबवीता काम रेटून नेण्याचे धोरण आखणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला शहरात भूसंपदान प्रक्रिया राबवावी लागली आहे. ही भूसंपादन प्रक्रिया राबवीताना प्रशासनाची दमछाक झाली आहे. शहर नाक्यापासून ते १८०० मिटर अंतरापर्यंत हे काम रखडले आहे. मात्र केवळ प्रशासनाच्या आडमुठी धोरणामुळे हे काम रखडले आहे. याधर्तीवर २६ जानेवारी २०२४ रोजी शहरातील दिपक परचुरे व ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्विकारला होता. त्यावेळी प्रांताधिकारी व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी वर्गाने दोन ते तीन महिन्यामध्ये काम सुरू केले जाईल असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाला ६ महिने होऊनही अद्याप कोणतेही काम सुरू केलेले नाही. यामुळे पुन्हा १५ ऑगस्ट रोजी गुहागर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिपक परचुरे व ग्रामस्थांनी दिला आहे. Fasting again for National Highway
प्रांताधिकाऱ्यांची केवळ आश्वासने
दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आयोजित उपोषण थांबवण्यासाठी प्रांताधिकारी यांनी सदर प्रकरणी गांभिर्याने दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर पुन्हा बैठक घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून मार्च २०२४ च्या आत येथील जनतेला पैसे मिळतील असेही बिनधास्त सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात केवळ आश्वासनाची खैरातच दिली गेली होती. मुळात भूसंपादनाची प्रक्रिया काही अंशी अर्धवट आहे. याबाबत सत्यता सांगावयास गेल्यावर उडवाउडवीची उत्तरे प्रांताधिकारी यांनी दिली होती. यामुळे प्रत्यक्षात भूसंपदानाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने जनतेला पैसेही मिळालेले नाही. यामुळे केवळ उपोषणकर्त्यांना आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचे काम प्रशासन करत असल्याचेही बोलले जात आहे. Fasting again for National Highway