मयुरेश पाटणकर, गुहागर 9423048230
Guhagar News : गुहागर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाले तर महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा विजय थोडक्यात हुकला आणि आमदार जाधव पराभूत होता होता वाचले. असेच म्हणावे लागेल. उमेदवारी अर्ज भरताना 50 हजाराच्या मताधिक्याची डरकाळी आमदार जाधव यांनी फोडली होती. मात्र निवडणूक रंगु लागली आणि मविआचे मताधिक्य घटू लागले. मतदानानंतर तर वाढीव मतदानामुळे महायुतीचा निसटता विजय होईल अशी चर्चा सुरु झाली. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार हे नक्की झाले. मतमोजणीतून तेच समोर आले. मतमोजणीच्या पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये खेड तालुक्यातील खाडीपट्ट्याने आमदार जाधव यांचे मताधिक्य 8 हजाराने वाढवले. हे मताधिक्य नंतर कमी कमी होत अखेर 2830 च्या मताधिक्याने आमदार जाधव विजयी झाले. म्हणूनच हा टळलेला पराभव आहे. Election Analysis
या निवडणुकीत महायुतीने नुसतेच मनापासून काम केले असे नाही तर एकमेकांमध्ये समन्वय ठेवण्यातही कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यशस्वी झाले. मतदारसंघात महायुतीने केलेला प्रचार, लाडकी बहीण योजना आणि समाजाचा मुद्दा प्रभावी ठरल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. परंतु हे मुद्दे महायुतीला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत. मुंबईतील मतदार आणण्यात, मनसे आणि अपक्षांना रोखण्यात आणि गुहागर तालुक्यात महायुती आणखी यशस्वी झाली असती तर हा पराभव विजयात बदलु शकला असता. त्याचप्रमाणे खेड खाडीपट्ट्याकडे रामदास कदम यांनी लक्ष घातले असते तर वेगळा निकाल पहाता आला असता. म्हणूनच हा राजेश बेंडल यांचा, महायुतीचा हुकलेला विजय आहे. असे म्हणावेसे वाटते. Election Analysis
आमदार जाधव यांची खाडीपट्ट्यावर पकड मजबूत
गुहागर मतदारसंघात खेड तालुक्यातील साधारणपणे पन्हाळजे, बहिरवली, सवणस, शिरवल, नांदगांव, भोस्ते, निळीक, मेटे, आयनी, चिपळूण तालुक्यातील मालदोली, दोणवली, चिवेली, वाघिवरे, गुहागर तालुक्यातील वडद, परचुरी, पांगारी तर्फे हवेली, विसापूर, पेवे, साखरी त्रिशुळ, धोपावे, वेलदूर या भागाला खाडीपट्टा म्हटले जाते. त्यातील गुहागर तालुक्यातील भाग अपवाद म्हणून सोडून दिल्यास येथे आमदार जाधव यांना 5 हजारांचे मताधिक्य (सुमारे 8 हजार मते) मिळाली. त्यावरुन खाडीपट्ट्यावर आमदार जाधव यांची मजबुत पकड असल्याचे सिध्द केले आहे. Election Analysis
गुहागर तालुक्यातील समुद्रकिनारी अंजनवेल, असगोली, पालशेत, कोंडकारुळ, वेळणेश्र्वर, हेदवतड, तवसाळ, पडवे, कुडली या भागात मच्छीमार समाज रहातो. यापैकी साखरीआगर, वेळणेश्र्वर, धोपावे, तवसाळ, पडवे या गावातील मच्छीमारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमदार जाधव यांनी यशस्वी प्रयत्न केले. समुद्र व खाडी किनारी वर्षानुवर्ष रहाणाऱ्या मच्छीमार समाजाच्या घराखाली जमीन त्यांच्या मालकीची करुन दिली. वेळणेश्र्वरला संरक्षक भिंती, साखरीआगर येथील जेटी, धोपाव्याचा पाण्याच प्रश्र्न असे वर्षानुवर्ष रखडलेले विषय आमदार जाधव यांनी मार्गी लावले. त्यामुळे येथेही सुमारे 1200 चे मताधिक्य आमदार जाधव यांना मिळाले. मच्छीमार समाजाबरोबर मतदारसंघातील मुस्लीम समाजानेही आमदार जाधव यांनाच साथ दिली. याच मताधिक्याने जाधव यांना विजयासमीप नेले. Election Analysis
मतदारसंघातील खाडीपट्ट्या वगळता चिपळूण व गुहागरमधील बुथमध्ये महायुतीने आघाडी घेतली. मात्र ही आघाडी जाधव यांचे मताधिक्य तोडण्यात यशस्वी होऊ शकली नाही. ज्या कुणबी समाजाच्या भरवशावर राजेश बेंडल यांना उमेदवारी मिळाली तो समाज पूर्ण ताकदीनिशी बेंडल यांच्या पाठीशी उभा राहील अशी अपेक्षा होती. मात्र मतमोजणीच्या आकडेवारीवरुन तसे दिसत नाही. भाजप प्रचारात उतरेल की नाही अशी शंका होती. मात्र ती मतमोजणीने फोल ठरवली. मतमोजणीच्या दिवशी मुंबईहून अनेक मतदार गुहागर मतदारसंघात मतदानासाठी येणार होते. मात्र आयत्यावेळी विरारमध्ये गाड्या अडविण्यात आल्या. मतदारांनी मतदानाला येण्यासाठी आरक्षित केलेल्या सुमारे 225 गाड्यांपैकी केवळ 100 गाड्यांच गुहागरमध्ये येऊ शकल्या. सर्व गाड्या आल्या असत्या तर महायुतीच्या मतांमध्ये आणखी वाढ झाली असती. Election Analysis
मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी, 6712 मते घेतली. तीन अपक्ष उमेदवारांना 2961 मते पडली. तर नोटाला 1197 मते पडली. या मतांपैकी अर्धी मते मिळाली असती तरी देखील महायुती विजयी झाली असती. गुहागर शहरात राजेश बेंडल यांनी नगरपंचायत निवडणुकीत कुणबी समाजाची मोट बांधत अन्य समाजाला हाक देत शहर विकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केला. त्यावेळी शहर विकास आघाडीला झालेले मतदान राजेश बेंडल यांना मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात केवळ 1492 मतांचीच आघाडी राजेश बेंडल यांना मिळाली. Election Analysis
एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे या घोषणा महाराष्ट्रात परिणामकारक ठरल्याची चर्चा आहे. मात्र गुहागर विधानसभा मतदारसंघात या घोषणांचा असर दिसला नाही. या कारणांमुळेच अवघ्या 2830 मतांनी महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा विजय हुकला. शेवटी विजय हा विजय असतो या म्हणण्याप्रमाणे पुढची पाच वर्ष आमदार जाधव हेच गुहागरचे नेतृत्त्व करणार हे निकालातून स्पष्ट झाले आहे. Election Analysis