मुंबई, ता. 03 : मुलुंड येथील वझे- केळकर महाविद्यालयात दरवर्षी आयोजित केला जाणारा ध्रुवा संस्कृत महोत्सव शनिवार दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाला. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, दिल्ली यांच्या अष्टादशी प्रकल्पांतर्गत ध्रु्वा संस्कृत महोत्सवास अनुदान प्राप्त झाले. यंदा हे महोत्सवाचे नववे वर्ष होते. दरवर्षी संस्कृतशी निगडित निरनिराळ्या संकल्पना घेऊन त्यावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. Dhruva Sanskrit Festival at Vaze- Kelkar College
ह्यावर्षी निसर्ग ही संकल्पना घेऊन त्यावर आधारित गायन, नृत्य, नाट्य, विद्वत्परिषद्, प्रदर्शन, कोशान्वेषण, चित्रफलक, छात्रशिक्षक इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवामध्ये ४०० हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शवला. ज्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, बीड, लातूर व दिल्ली येथील तब्बल १८ शाळा आणि १५ महाविद्यालयांमधील विद्यार्थी व शिक्षकांचा समावेश होता. महोत्सव उद्घाटनाला पर्यावरणवादी दिलीप कुलकर्णी यांनी उपस्थित राहून ‘संस्कृतसाहित्यातून प्रेरित होऊन ख-या निसर्गाचा आस्वाद’ याबद्दल व्याख्यान दिले. तसेच प्राचार्या प्राध्यापिका डॉ . प्रीता निलेश यांनी ध्रुवाच्या समन्वयक अदिती माधवन् यांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले. ह्यावर्षीचा छात्रप्रतिनिधी कु. कार्तिक चन्दन याने ध्रुवाच्या विभागप्रमुखांची ओळख करून दिली. Dhruva Sanskrit Festival at Vaze- Kelkar College
तसेच समारोप सोहळ्यासाठी ‘प्राणीमित्र’ गणराज जैन महोदयांनी उपस्थित राहून सर्वांना निसर्ग – संवर्धनाचा संदेश दिला. ४ गटातून १८ स्पर्धा व इतर विशेष पारितोषिकांचे वितरण झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांचा आनंद अनावर झाला होता. ध्रुवा चमूचा मार्गदर्शक वरद मुळ्ये याने ध्रुवाच्या यंदाच्या लोगोमागील संकल्पना अप्रतिम रित्या स्पष्ट केली. Dhruva Sanskrit Festival at Vaze- Kelkar College
महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ.लता पुजारी यांनी ध्रुवा चमूचे कौतुक केले. १६ परीक्षक व स्पर्धक, सहभागी शिक्षक, भेट द्यायला येणारे असे सगळेजण या उत्साहाच्या संस्कृत-वातावरणात चिंब न्हाऊन गेले. अशाप्रकारे ध्रुवा संस्कृत महोत्सव २०२४ विद्यार्थीप्रतिनिधी कार्तिक चंदन, ७ विभागप्रमुख आणि ६८ विद्यार्थी अशा या गटामध्ये ११वी ते पदवीचे विद्यार्थी आणि काही माजी विद्यार्थी या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी हा महोत्सव मोठ्या दिमाखात पार झाला. Dhruva Sanskrit Festival at Vaze- Kelkar College