संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 30 : नुकत्याच अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी समाजाच्या निर्णयाचे पालन म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचे जरी मान्य केले असले तरी स्वतः जरांगे पाटील हे ठरल्याप्रमाणे राजकारणात न जाता समाजाच्या गरीब होतकरू तरुणांचे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडतील. समाजाच्या मतांचे विभाजन होऊ नये म्हणून एका मतदारसंघातून अनेक अर्ज भरण्यापेक्षा “एक लोकसभा, एक उमेदवार” देण्याची तयारी करण्याचे जरांगे यांनी सांगितले. Demand to nominate Kadam
त्याचाच भाग म्हणून कल्याण लोकसभा मतदार संघातून मराठा समाजाचे सर्वसामान्य कार्यकर्ते गणेश कदम यांना मराठा समाजाच्या वतीने अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. गुहागर तालुक्यातील काताळे या गावचे सुपुत्र गणेश कदम हे सध्या नोकरी निमित्ताने डोंबिवली पश्चिम येथे वास्तव्यास आहेत, कदम हे मराठा आंदोलक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. मागील काही दिवसापासून कल्याण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उभे राहून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. Demand to nominate Kadam
गणेश कदम हे मनसेचे डोंबिवली शहर सचिव या पदावर कार्यरत होते. परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी काही महिन्यापूर्वी त्यांनी मनसेच्या शहर सचिव पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगेची साथ दिली. मनसेचे संपर्क अध्यक्ष असताना त्यांनी २०१९ साली गुहागर मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर शिवसेनेचे वरिष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात देखील निवडणूक लढवली आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्या उमेदवारीचे चित्र स्पष्ट होईल त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात तिरंगी अशी अटीतटीची लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. Demand to nominate Kadam