महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने बाळशास्त्रींचे कार्य, विचार नव्याने लोकांसमोर आणले; डॉ. तानाजीराव चोरगे
रत्नागिरी, ता. 27 : “दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारिता, शिक्षण, लोकशिक्षण इत्यादीमधील कार्य अलौकिक आहे. केवळ कोकणालाच नव्हे तर संपूर्ण देशाला त्यांच्या कर्तृत्त्वाचा अभिमान आहे. त्यांचे स्मरण, स्मारक कार्यात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने गेल्या ३५ वर्षात सातत्याने दिलेल्या योगदानामुळेच बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य, विचार पुन्हा नव्याने लोकांसमोर आले आहे”, असे गौरवोद्गार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व कृषि, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते डॉ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केले. “Darpan” Acharya Balshastri Jambhekar
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांच्या नेतृत्त्वाखाली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे महाराष्ट्रातील पहिले स्मारक जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे ३५ वर्षांपूर्वी उभारले आहे. त्याच्या नूतनीकरण कामासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते २५ हजार रुपयांचा धनादेश महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे ज्येष्ठ आश्रयदाते, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांच्याकडे सुपूर्द केला. त्यावेळी डॉ. चोरगे बोलत होते. या वेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण उपस्थित होते. “Darpan” Acharya Balshastri Jambhekar
‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरण व स्मारक कार्यात देणगी देऊन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकी दाखविली आहे. त्यातून पुढील कार्यात संस्थेला अधिक जोमाने कार्य करण्यासाठी उमेद मिळाली आहे. कोकणातील सर्वच संस्था, उद्योजक यांनीही याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन राजाभाऊ लिमये यांनी डॉ. चोरगे व त्यांच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे धन्यवाद दिले. “Darpan” Acharya Balshastri Jambhekar