चिपळूण पोलीसांनी वाहन पकडले, एका गायीचा मृत्यू
गुहागर, ता. 13 : बुधवारी रात्री पोमेंडी परिसरातून 5 गायी आणि 1 वासरु असलेले चार चाकी वाहन विहींपच्या कार्यकर्त्यांनी रोखले. त्यातील दोन जणांना पकडल्यावर वाहन चालकाने वाहनासह तेथून पोबारा केला. ते वाहन चिपळूण पोलीसांनी पकडून गुहागर पोलीसांच्या ताब्यात दिले. त्याच कालावधीत पोमेंडीत विहींपच्या कार्यकर्त्यांची नजर चुकवून 1 आरोपी पळत होता. त्याला रात्रीची गस्त घालणाऱ्या गुहागर पोलीसांनी जेरबंद केले. या थरारक धावपळीत 1 गायीचा नाहक बळी गेला. Cow smuggling from Pomendi area
गुहागर तालुक्यातील पोमेंडी परिसरातून एक वाहन (एमएच06, बीडब्ल्यु 9644) बुधवारी रात्री 1 च्या सुमारास वेळंबच्या दिशेने चालले होते. पोमेंडीतील विश्र्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते श्रीराम विचारे यांना गोतस्करीची टिप आधीच मिळाली होती. त्यामुळे पोमेंडी, पालशेत, वेळंब परिसरातील विहींपचे कार्यकर्ते पाळत ठेवून होते. पोमेंडीत आलेल्या वाहनाचा संशय आल्याने श्रीराम विचारे यांनी हे वाहन थांबवले. यावेळी पोमेंडीचे पोलीस पाटील सुरेश विचारे त्यांच्यासोबत होते. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गायी असल्याचे दिसून आले. तातडीने विचारे यांनी पालशेतमधुन विजय नागवेकर यांना बोलावून घेतले तर पोलीस पाटील सुरेश विचारे यांनी गुहागर पोलीसांना खबर केली. वाहनातून दोनजण उतरले व त्यांनी वाहन सोडून देण्यासाठी खोटी नाटी कारणे उभी केली. पैशाचे आमिष दाखवले. मात्र विचारे आणि मंडळी या गोष्टी मान्य करण्यास तयार नव्हते. गुरांची वाहतूक करण्याचा परवाना आहे का, असे सांगत विचारे आणि त्यांच्या साथीदारांनी त्या दोघांना फटकवले. वादावादी आणि मारहाण पाहून वाहनचालकाने शिताफीने तेथून वाहनासह पोबारा केला. हे लक्षात येताच विहींपच्या कार्यकर्त्यांनी कोकण प्रांत सहमंत्री अनिऋद्ध भावे यांना कळविले. भावे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने यांना दूरध्वनीवरुन गोतस्करी करणारे वाहन घेवून चालक फरार झाल्याचे सांगितले. राजमाने यांनी तातडीने नाकाबंदीचे आदेश दिले. चिपळूण बायपास येथे हे वाहन चिपळूण पोलीसांनी पकडले. Cow smuggling from Pomendi area
दरम्यान पोमेंडीतून वाहनासह चालक पळल्याने उडालेल्या गोंधळात विचारे आणि सहकाऱ्यांनी पकडलेल्या गो तस्करांपैकी एकाने तेथून पलायन केले. परंतु पोमेंडीत गायी असलेली गाडी अडकविल्याचे समजल्यानंतर गस्त घालणारे पोलीस वेळंबवरुन पोमेंडीच्या दिशेने येत होते. त्यांनी पळणाऱ्या आरोपीला जेरबंद केले. अशा तऱ्हेने रात्री 1 वाजता सुरु झालेले थरारनाट्य 3.30 च्या सुमारास संपले. विहींपचे कार्यकर्ते आणि पोलीसांनी दोन आरोपींना घेवून गुहागर पोलीस ठाणे गाठले. 5 च्या सुमारास चिपळूणकडे पलायन करुन गेलेले वाहन गायींसह गुहागर पोलीस ठाण्यात आले. Cow smuggling from Pomendi area
त्यानंतर सकाळी गुहागर पोलीसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना गायींची तपासणी करण्यासाठी बोलावले. तेव्हा वाहनातील पाच पैकी 1 गाय मृत पावल्याचे लक्षात आले. या गायीवर गुहागर पोलीस आणि विहींपच्या कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार केले. गुहागरच्या स्मशानात गायीचा मृतदेह पुरण्यात आला. उर्वरीत चार गायी आणि एका वासराला कौस्तुभ दिक्षित यांनी पेंढा आणून दिला. सकाळी 9 च्या सुमारास कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विहींपचे कार्यकर्ते विजय नागवेकर आणि गुहागर पोलीसांपैकी एक प्रतिनिधी यांनी गोतस्करीसाठी आणलेल्या गायी व वासरु लोटे येथील कोकरे महाराजांच्या गोशाळेत सोडले. Cow smuggling from Pomendi area
या प्रकरणात गुहागर पोलीसांनी हिदायत जनिरुद्दीन उलदे (चालक), जावेद हुसेन दाऊद वाळवटकर, आनस अब्दुल रशीद खतीब सर्वजण रहाणार मुरुड रायगड, संदीप सीताराम पालशेतकर, मार्गाताम्हाणे आणि निलेश गणपत काताळकर, पोमेंडी यांना 12 डिसेंबरला सकाळी अटक केली. त्यांना आजच कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने या 5 जणांची जामिनावर मुक्तता केली. तसेच पोलीसांनी ताब्यात घेतलेले वाहन देखील गाडी मालकाला परत देण्याचे आदेश दिले आहेत. Cow smuggling from Pomendi area