गुहागर, ता. 29 : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे चालक गेली १९ वर्षे अल्प मानधनावर काम करत आहेत. तरीही त्यांना वेळेवर मानधन मिळत नाही. गेले तीन महिने त्यांचे मानधन न झाल्यामुळे चालकांनी १ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद शासनाला दिला आहे. चालकांनी आंदोलन केल्यास रुणसेवेवर मोठा परिणाम होणार आहे. Contract Ambulance Drivers strike
जिल्ह्यात १०२ या रुग्णवाहिकेवर वाहनचालक २००५ पासून अल्प मानधनावर कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकांवर रात्रंदिवस हे चालक रुग्णांना सेवा देतात. राष्ट्रीय सुटीच्या दिवशीही वाहनचालक काम करतात. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. ही अत्यावश्यक सेवा असतानाही अनेक वाहनचालकांची नोकरीची वयोमर्यादा ओलांडली आहे. कोणत्याही वेळी सेवा देण्यास तत्पर असणाऱ्या चालकांना अल्प मानधनावर काम करावे लागते. तेही वेळेवर मिळत नसल्याची खंत वाहनचालकांकडून व्यक्त करण्यात आली. लोकप्रतिनिधींना भेटून मानधन वेळेवर मिळावे, अशी मागणी करत आहेत. Contract Ambulance Drivers strike
गेल्या तीन महिन्यांचे त्यांचे मानधन थकीत आहे. थकीत मानधन आणि नियमित मानधनासाठी या रुग्णवाहिका चालकांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मानधन देण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर केवळ एका महिन्याचे मानधन देऊन बोळवण करण्यात आली होती. शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपैकी अर्धेही मानधन चालकांना दिले जात नाही. वर्षातून फक्त तीन ते चारवेळा मानधन मिळते. या चालकांकडून औषधे आणण्यापासून ते दवाखान्यापर्यंतची सर्व कामे करुन घेतली जातात. रात्री-अपरात्री रुग्णांना सेवा दिली जाते मात्र, तरीही त्याची दखल न घेता वेतनाबाबत रखडवले जात आहे. Contract Ambulance Drivers strike