ग्रामस्थ संतप्त, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीकडून 38 संस्थांना नोटीसा
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील शृंगारतळी वेळंब फाटाजवळील नाल्यात सांडपाणी सोडल्याने नाल्यातील पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या विहीरी, बोअरवेल दुषित झाले आहेत. गेली दोन वर्ष हे सहन करणाऱ्या ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा इशारा दिला. प्रशासनाने सक्रीय होत ३८ संस्थांना नोटीसा पाठवल्या आहेत. यामध्ये शृंगारतळीतील व्यावसायिक, हॉटेल चालक, निवासी संकुले यांचा समावेश आहे. नदीपात्रात सोडण्यात आलेले सांडपाणी तातडीने पूर्णतः थांबवावे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. Contamination of water source in Guhagar Sringaratali


वेगाने विकसीत होणाऱ्या शृंगारतळी गावात हॉटेल व्यावसायिक, निवासी संकुले यांची संख्या वाढत आहे. मात्र या वाढत्या बांधकामांनंतर आवश्यक असलेल्या व्यवस्था सुनियोजितपणे उभ्या राहील्या नाहीत. शृंगारतळी बाजारपेठेच्या दोन्ही बाजुने दोन नाले आहेत. या नाल्यांमध्येच सर्व सांडपाणी सोडले जात असल्याने दोन्ही नाले दुषित झाले आहेत. त्यापैकी वेळंब फाट्याजवळील नाल्यातील दुषित, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नाल्याच्या परिसरात रहाणाऱ्या लोकांच्या विहीरी, बोअरवेल दुषित झाले. हे पाणी पिण्यासच नव्हेतर आंघोळीसाठी किंवा अन्य वापरासाठी देखील वापरणे धोकादायक असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला. या दुषित पाण्यामुळे येथील लोकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी दोन वर्षात अनेक तक्रारी केल्या परंतू त्यांना दाद मिळत नव्हती. अखेर वैतागलेल्या ग्रामस्थांनी सांडपाण्याची गटारे बुजवून टाकण्याची व नाल्यातच आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर गटविकास अधिकारी, तहसीलदार यांनी तातडीने पहाणी केली. ग्रामपंचायतीने नाल्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे फोटो, व्हिडिओ आदी गोष्टींचे चित्रीकरण केले. त्यानंतर गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायतीने 38 जणांना दंडात्मक कारवाईच्या नोटीसा पाठवल्या आहेत. दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबतची एक सभाही पंचायत समितीमध्ये आयोजित केली आहे. Contamination of water source in Guhagar Sringaratali


सुरवातीला केवळ 38 नोटीसा पाठवल्या होत्या. आता या नोटीसांची संख्याही 45 वर पोचली आहे. सांडपाणी सोडणाऱ्या प्रत्येक व्यक्ती अगर संस्थेला नोटीस पाठविण्यात येणार आहे. – आसिम साल्हे, उपसरपंच पाटपन्हाळे ग्रामपंचायत
आम्हाला नोटीस मिळाली आहे. मात्र आम्ही हॉटेल व लॉज सुरू करतानाच एक छोटा जलशुध्दीकरण प्रकल्प बांधला तो आजही क्रियान्वीत आहे. शिवाय शौचालयाचे खड्डे आम्ही उपसून त्यातील पाणी दुसरीकडे नेऊन टाकतो. त्यामुळे आमच्या व्यवसायातून नदीत जाणारे पाणी बऱ्यापैकी शुध्द असते. मात्र यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी आमचे सहकार्य नक्की असेल – ओंकार संसारे, हॉटेल व्यावसायिक, शृंगारतळी Contamination of water source in Guhagar Sringaratali