राजेंद्र आरेकर, डॉ. मनोज पाटील, प्राची कारेकर व सुधाकर कांबळे यांचा गौरव
गुहागर, ता. 23 : पाठ्यपुस्तकात कविता, चित्रे आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाच्या माध्यमातून गुहागर तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल करणाऱ्या मान्यवरांचा गुहागर तालुका सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालय व महाराष्ट्र साहित्य परिषद, गुहागर शाखेच्या संयुक्त विद्यमाने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचाही गौरव करण्यात आला. Civic reception in Guhagar
कार्यक्रमात ज्येष्ठ अधिव्याख्याता तथा रत्नागिरी डायटच्या दीपा मिलिंद सावंत म्हणाल्या, “पाठ्यपुस्तकात कविता किंवा धडा समाविष्ट होणे ही सामान्य गोष्ट नाही. राजेंद्र आरेकर यांची कविता इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात, डॉ. मनोज पाटील यांची मराठी भाषा पाठ्यपुस्तक मंडळावर निवड आणि प्राची कारेकर यांनी रेखाटलेली ४३ चित्रे तिसरी-चौथीच्या पाठ्यपुस्तकांत समाविष्ट होणे, हा गुहागर तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, सातत्यपूर्ण प्रयत्नांतूनच यश मिळते. वाचनालयांनी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवावी. चित्रकला, साहित्य अशा कलागुणांनाही करिअरच्या संधी उपलब्ध असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांत सहभागी करून सर्वांगीण विकास साधावा. माजी मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी एमसीसी, एनसीसी व होमगार्डच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविल्याचेही त्यांनी गौरवाने नमूद केले. Civic reception in Guhagar
या कार्यक्रमात इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक अनय मंदार कानडे, ज्ञानदा निलेशकुमार ढेरे, अन्वित विक्रांत दिगे तसेच इयत्ता आठवीतील सोहम समीर बावधनकर, गार्गी अमोल शिरसागर, कुमार वरद केदार भागवत आणि वेदिका राजा हरिश्चंद्र जगदाळे यांचा सन्मान करण्यात आला. Civic reception in Guhagar

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नीता मालप तर प्रमुख उपस्थिती पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांची होती. संत नामदेव शिंपी समाज, अनिरुद्ध उपासना केंद्र, प्राथमिक शिक्षक संघ, शिवतेज फाउंडेशन आणि श्री व्याघ्रांबरी देवस्थान यांच्या वतीनेही सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला. Civic reception in Guhagar
यावेळी ॲड. संकेत साळवी, मुख्याध्यापिका सुजाता कांबळे, प्रा. रश्मी अडेकर, चंद्रकांत झगडे, दत्तात्रय गुरव, ज्ञानेश्वर झगडे, विवेक जोशी, प्रभुनाथ देवळेकर, बाबासाहेब राशिनकर, ईश्वरचंद्र हलगरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथपाल गौरी घाडे, सानिका जांगळी व देवाळे यांनी परिश्रम घेतले, तर सूत्रसंचालन प्रा. मनाली बावधनकर यांनी केले. Civic reception in Guhagar
