जे. डी. पराडकर, संगमेश्वर यांचा लेख
GUHAGAR NEWS : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या आजवरच्या सर्व कामगिरीला डाग लावण्याचे काम म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होय. गडकरी यांनी या मार्गाच्या कामाबाबत कितीही खुलासे करुन ही जबाबदारी आपली नाही , असे अनेकदा सांगितले असले, तरीही ज्यावेळी दर्जाचा प्रश्न उभा रहातो त्यावेळी जबाबदारी सत्ताधारी असणाऱ्या कोणालाही झटकता येत नाही. चिपळूण मधील आजची पूल कोसळण्याची घटना म्हणजे कोकणवासीयांच्या सोशिक भावनांवर उन्मत्त ठेकेदारांकडून मीठ चोळले जाण्याचा प्रकार असून केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यांनी आता याबाबत कठोर कारवाई करुन आपल्यातील रामशास्त्री बाणा दाखवायला हवा. कोकणवासीय सोशिक जरुर आहेत मात्र वेळ पडल्यास, हातात हंटर घेऊन उन्मत्त ठेकेदारांना फोडून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवापेक्षाही मंद गतीने होत असून याकामाच्या दर्जा बाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करुन राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही. संरक्षक भिंतींसह, जमिनीची समपातळी करताना ठेकेदार कंपन्या कामावर पाणी मारत नाहीत अशा तक्रारी अनेकदा करुनही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कोणी जाब विचारायला गेले, तर पोलीस यंत्रणेला हाताशी धरुन ठेकेदारांनी जाब विचारणाऱ्यांवर कारवाईची धमकी दिली आहे. उन्मत्त झालेल्या ठेकेदारांनी गेली बारा वर्षे कोकणवासीयांना अक्षरशः छळले आहे. आता खरोखरच या ठेकेदारांना हंटर दाखविण्याची वेळ आली असल्याचे आजच्या चिपळूणच्या घटनेने अधोरेखित केले आहे. Chiplun flyover girder collapsed
चिपळूण येथे मुख्य नाक्यावर थेट ४६ पिलर्सचा उड्डाणपूल उभारला जाणार म्हणून कोकणवासीयांनी एकवेळ खूप कौतूक केले. महामार्गावरील हा सर्वात मोठा उड्डाणपूल म्हणूनही गाजावाजा करण्यात आला. सर्व प्रसिध्दी माध्यमांनी या कामाचे कौतुक केले होते. पूलाच्या पिलर्सचे काम झाल्यानंतर गर्डर टाकताना अत्यंत आधुनिक अशी यंत्रणा उभारण्यात येणार असा गाजावाजा ठेकेदार कंपनीने केला होता. पूल उभारणाऱ्या कंपनीची अत्याधुनिक यंत्रणा आज सर्वांनाच प्रत्यक्ष दिसून आली. जर ही यंत्रणा आधुनिक होती, तर एवढे दिवस काम रखडले का ? काही महिन्यांपूर्वी गर्डरलॉंचरचे जॅक तुटले होते आणि भयावह दुर्घटना घडताघडता वाचली होती. असे प्रकार घडूनही ठेकेदार कंपनीने आवश्यक ती काळजी न घेतल्यानेच आज प्रथम पूलाला तडे गेले आणि त्यानंतर पूल कोसळला. ज्या ठेकेदार कंपनीची एवढे मोठे काम करण्याची क्षमता नाही, अशा कंपनीला हे काम दिले जाणे, म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचाच हा दुर्दैवी प्रकार आहे. पनवेल ते बांदा या दरम्यान एल ॲण्ड टी सारखी एकतरी नावाजलेली कंपनी काम करत असल्याचे कोणाला ज्ञात असेल तर सांगा. केवळ निष्काळजीपणा हेच चिपळूण येथील उड्डाणपूल कोसळण्यामागचे एकमेव कारण आहे. हे कारण शोधण्यासाठी एखादी समिती नेमून तीन – चार महिने वाया घालवण्याची राज्य अथवा केंद्र शासनाला आवश्यकता नाही. प्रथम केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आणि नंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हातात हंटर घेण्याची खरी गरज आहे. या दोन्ही मंत्र्यांच्या स्पष्टवक्तेपणाला, शिस्तबध्द कामाला कोकणवासी आजवर मान देत आले आहेत. मात्र गेली बारा वर्षे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे मंदगतीने सुरु असणाऱ्या कामाला, ठेकेदारांच्या उन्मत्तपणाला, दर्जाहीन कामामुळे होणाऱ्या वाहनांच्या नुकसानाला, असंख्य अपघातांना कोकणी जनता कंटाळली आहे. मंत्र्यांनी पूल दुर्घटनेबाबत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासह आवश्यक ती कार्यवाही न केल्यास आता कोकणी जनता या उन्मत्त ठेकेदारांना हंटरने फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. Chiplun flyover girder collapsed
चिपळूण नाक्यावरील हा पूल उभारताना सुरक्षेचे कोणतेही नियम आणि निकष ठेकेदार कंपनीने पाळलेले नाहीत. ४६ पिलर्सचे कौतूक म्हणून मुख्य नाक्यापासून प्रांत कार्यालयापर्यंत गेली दोनवर्षे दुकानदार, पादचारी, वाहनचालक, रहिवासी, पादचारी, छोटे व्यावसायिक या सर्वांचा अनन्वित छळच या ठेकेदारांनी केला आहे. यांना किती त्रास झाला ते अन्य लोकांना कसे कळणार ? गेली दोन वर्षे हा त्रास आणि छळ सहन केल्यानेच बेजाबदार बनलेले ठेकेदार आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठले आहेत. या पूलाचे एकमेकांना जोडले जाणारे गर्डर्स सावर्डे कोंडमळा येथे तयार केले जात आहेत. तयार केलेले गर्डर्स रस्त्यावर ठेवून ठेकेदार कंपनीने सलग दोन वर्षे अपघातांना निमंत्रण दिले. याबाबतही राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांनी कोंडमळा ग्रामस्थ आणि वाहनचालकांसाठी आवाज उठवला. सावंत यांच्या निवेदनांना ठेकेदार आणि बांधकाम विभागाने केराची टोपली दाखवली. अखेर सर्वसामांन्यांसाठी लढणाऱ्या संदीप सावंत यांनी शेकडो माणसे रस्त्यावर उतरवून आपली ताकद दाखवली. संदीप सावंत यांच्यावर कारवाई करायला शेकडो पोलीस दाखल झाले. वास्तविक पोलीस यंत्रणेने सावंत यांचे रास्त म्हणणे समजून घेऊन ठेकेदारावर कारवाई करायला हवी होती. मात्र असे न होता संदीप सावंत सावर्डे पोलीस ठाण्यात आणि ठेकेदार मोकाट अशी स्थिती होती. सावर्डे पोलीस ठाण्यातूनच त्यावेळी सावंत यांनी सोशल मिडीयावर टाकलेला व्हिडिओ खूप बोलका होता. सावंत ज्या जनतेसाठी ठेकेदारांविरुध्द लढत होते, तेच आज आणखी भयावह रुप घेऊन घडले. संदीप सावंत यांच्या रास्तारोको नंतर कोंडमळा येथील गर्डर कसे काय उचलले गेले ? याचा अर्थ ठेकेदार कंपनी दडपशाही करत होती हे स्पष्ट झाले. या दडपशाही विरोधात आता खरोखरच हंटर उचलण्याची वेळ आलीय. Chiplun flyover girder collapsed
मुंबई गोवा महामार्गाचे काम सिमेंट कॉंक्रीट मध्ये केले जात आहे. कोकणात कॉंक्रिटीकरण उपयुक्त नाही, हे येणारा काळ दाखवून देणार आहेच. मात्र सद्यस्थितीत ५०० मीटर रस्ता देखील तडे नसलेला सापडणार नाही. रस्त्याला समपातळी हा प्रकारच नसल्याने केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यांनी एकदा कारने मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करावा एवढीच कोकणवासीयांची आणि वाहनचालकांची माफक अपेक्षा आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचे चौपदरीकरण दर्जेदार आहे, असे प्रत्यक्ष काम पाहिल्यानंतर जाहिरपणे सांगितले, तर कोकणवासीयांचा ‘ प्रामाणिकपणा ‘ या शब्दावरील विश्वासच उडून जाईल. केंद्रीय मंत्र्यांनी आता खरंच कोकणवासीयांच्या आधी हातात हंटर घेऊन तो चालवायला हवा आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण गेल्या सहा महिन्यात किमान चारवेळा तरी या मार्गाने आले त्यांना चौपदरीकरणाचे काम खरंच दर्जेदार वाटले ? असल्यास त्यांनी देखील या दर्जाचे मापदंड कोकणवासीयांना सांगून टाकावे. Chiplun flyover girder collapsed
आज चिपळूणची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आमदार शेखर निकम घटनास्थळी भेट द्यायला गेले आणि उर्वरित पूल कोसळला. कोसळण्याचा हा आघात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आमदारांच्या नशीबी का यावा ? म्हणजे खऱ्याची दुनियाच राहिली नाही, त्याचा हा संकेत होता काय ? आमदार शेखर निकम यांच्या पाठी जनतेचे असणारे आशीर्वाद आज त्यांना या दुर्दैवी घटनेप्रसंगी अनुभवायला मिळाले. आमदार शेखर निकम आता सत्तेत सामील झाले असले तरीही, हिवाळी अधिवेशनात संबंधित ठेकेदाराला ते विधानसभेत योग्य तो धडा शिकवतील याबाबत खात्री वाटते. आजची घटना एवढी दुर्दैवी आहे की, यावरून योग्य त्या कारवाईची अपेक्षा सर्वांनीच करायला हवी. आजच्या घटनेत कोणातीही जीवितहानी झाली नाही हेच खरे सुदैव आहे. जीव गेले की लाखोंची मदत जाहिर करायची आणि जीव गेले नाहीत तर, मात्र दुर्लक्ष करायचे असे चिपळूणच्या आजच्या दुर्घटनेबाबत घडू नये एवढीच गेली बारा वर्षे महामार्गाच्या कामाने त्रस्त असलेल्या कोकणवासीयांची अपेक्षा आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करुन आपल्यातील रामशास्त्री बाणा दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. अन्यथा कोकणवासीयांचा प्रामाणिकपणा या शब्दावरील विश्वासच उडून जाईल . सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकण रेल्वे प्रकल्पाच्या उभारणीचा अभ्यास करण्याची खरी गरज आहे. चिपळूण उड्डाणपूलाचे उर्वरित काम संबंधित ठेकेदार कंपनीकडून काढून घेऊन अत्यंत दर्जेदार आणि नावाजलेल्या कंपनीकडे देण्यातच शहाणपणा आहे . कोकणवासीयांना हंटर उचलण्याची वेळ कोणीच आणू नये. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा दर्जा हा एक रुपयाचा देखील टोल देण्याच्या लायकीचा नाही , हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः अनुभवले आहे . कोकणवासीय तर गेली १२ वर्षे जे भोगत आहेत , ते मरणयातनांपेक्षा वाईट आहे . कोकणवासीयांच्या सहनशीलतेचा अंत पहाणे कोणाकोणाला जड जातेय , ते येणारा काळ ठरवेल . तुर्तास उन्मत्त ठेकेदारांना कोकणवासीयांच्या हंटरची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे यात संदेह नाही. Chiplun flyover girder collapsed