पहिल्या टप्प्यात होणार प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्या दर्शन
रत्नागिरी, ता. 07 : जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ देण्याचे नियोजित असून, समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांमार्फत पहिल्या टप्प्यांमध्ये पवित्र तीर्थ क्षेत्र असलेले प्रभू श्री राम यांची जन्मभूमी असणाऱ्या अयोध्या या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी केले आहे. Chief Minister Tirtha Darshan Yojana


राज्यातील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला योजनेचा एकवेळ लाभ मिळणार आहे. योजनेंतर्गत प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास आदींचा समावेश असेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार असावे. राज्याचा रहिवासी असावा व वय वर्षे 60 वरील ज्येष्ठ नागरिक असावा. Chief Minister Tirtha Darshan Yojana
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. प्रवाशांच्या निवड प्रक्रियेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेकरिता 800 प्रवाशी इतकी मर्यादा आहे. पहिल्या टप्यामध्ये पवित्र तीर्थ क्षेत्र असलेले प्रभू श्री राम यांची जन्मभूमी असणाऱ्या अयोध्या या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी स्थळाची निवड केली आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, ता. जि. रत्नागिरी, दू. क्र. ०२३५२-२३०९५७ येथे संपर्क करावा. Chief Minister Tirtha Darshan Yojana