प्रेरणा शिंदे व श्रावणी मेस्त्री ग्रुप प्रथम
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी विभागातर्फे बोंडला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा.राधिका कदम यांनी काम पाहिले. Bondla Competition at Velneshwar College


नवरात्र हा निसर्गाच्या सर्जनशीलतेचा आणि निर्मितीशील स्त्रीशक्तीचा उत्सव! खंडेनवमी पूजन कार्यक्रमाचे औचित्य साधून ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. निसर्गातील पानाफुलांच्या साह्याने विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक बोंडले साकारले. आधुनिकतेचा आग्रह धरताना आपली परंपरा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, विद्यार्थ्यांच्या अंगी अवगत असलेल्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रेरणा शिंदे व श्रावणी मेस्त्री या ग्रुपने पटकाविला. द्वितीय क्रमांक कु.इशा हेगशेट्ये व कु.अक्षता कदम यांनी तर तृतीय क्रमांक कु. गौरव तेरेकर व कु.मानस विचारे या ग्रुपने मिळविला. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र सोनी, उपप्राचार्य अविनाश पवार, संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा.केतन कुंडीया व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. Bondla Competition at Velneshwar College