ग्रामस्थांसह भाजपचे बांधकाम विभागाला निवेदन
गुहागर, ता. 10 : गुहागर वेलदूर या राज्य महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजवावे अन्यथा नाईलाजाने आंदोलन करावे लागेल. अशी दोन निवेदने सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या अभियंत्यांना गुहागरचे ग्रामस्थ आणि गुहागर शहर भाजपाच्या वतीने देण्यात आली आहेत. यावेळी चर्चा करताना येत्या चार पाच दिवसात पाऊस कमी झाल्यावर खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्र्वासन अभियंता यांनी दिले आहे. BJP’s statement to Construction Department


गुहागर शहरातील बाजारपेठ, देवपाट, वरचापाट, वरचापाट भंडारवाडी, मोहल्ला, बाग भंडारवाडी या भागातून गुहागर वेलदूर हा राज्य महामार्ग जातो. या महामार्गावर शहरातील बाजारपेठ, देवपाट, वरचापाट, वरचापाट भंडारवाडी, मोहल्ला, बाग भंडारवाडी परिसरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. गणपतीच्या आधी हे खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र त्यानंतर पडलेल्या पावसात खड्ड्यातील माती वाहून गेली. याच रस्त्याच्या खालून गुहागर नगरपंचायतीची पाणीपुरवठा करणारी जलवाहीनी गेली आहे. खड्ड्यामुळे 7 ते 8 ठिकाणी ही जलवाहीनी देखील फुटली. या जलवाहीनीची दुरुस्ती करताना नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. काही दुचाकीस्वार अपघात होवून दुखापतग्रस्त झाले. BJP’s statement to Construction Department


त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरने रस्त्याच्या दुरावस्थेची गांभिर्याने दखल घ्यावी. तातडीने सदरचे खड्डे पडलेल्या ठिकाणी डांबरीकरणाचे पॅच मारावेत. अशी मागणी गुहागर शहरातील नागरिकांनी केली आहे. याबाबतच एक निवेदन नागरिकांनी बांधकाम उपविभागाला दिले. त्यावर शहरातील हॉटेल व्यावसायिक शार्दुल भावे, दुकानदार हेमंत बारटक्के, व्यापारी सौ. सोनल सातार्डेकर, गजानन वेल्हाळ आदींच्या सह्या आहेत. अशाच पध्दतीचे निवेदन गुहागर शहर भाजपातर्फेही देण्यात आले. त्यावेळी गुहागर शहर भाजपचे उपाध्यक्ष सतीश शिलधनकर, भाजपयुमोचे उपजिल्हाध्यक्ष संगम मोरे, शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, नंदकुमार शिलधनकर, प्रदिप मोरे उपस्थित होते. BJP’s statement to Construction Department