तावडे भवनचा वर्धापनदिन; सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
रत्नागिरी, ता.15 : आडिवरे येथील क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या तावडे अतिथी भवनच्या सातव्या वर्धापनदिनी श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. या रंगारंग कार्यक्रमाला आडिवरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मुंबईकर, तावडे मंडळींनी आवर्जून हजेरी लावली. Bhoomipujan of the temple at Adivare


तावडे यांचे कुलदैवत श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या भूमीपूजनाचा मान आर्किटेक्ट आणि तावडे अतिथी भवनाचे शिल्पकार संतोष तावडे यांना मिळाला. पहिल्या दिवशी सायंकाळी रत्नागिरीतील स्वराभिषेक प्रस्तुत भक्तीधार हा अभंग, भक्तीगीतांचा कार्यक्रम रंगला. वर्धापनदिनानिमित्त दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले होते. या पुजेचे यजमान मंडळाचे उपाध्यक्ष सुहास तावडे दांपत्य होते. सायंकाळी ५ वाजता क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाची वार्षिक आढावा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्यानंतर पावणादेवी नृत्यसंघ (किंजवडे, ता. देवगड) प्रस्तुत समई नृत्याने सर्वांची वाहवा मिळवली. श्री सप्तकोटेश्वराच्या मूर्तीसमोर हे समई नृत्य बहारदार झाले. त्यानंतर आई भगवती कलादिंडी भजन मंडळाने (तोरसोळे, ता. देवगड) दिंडी भजन सादर केले. त्यालाही उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला. Bhoomipujan of the temple at Adivare


दोन्ही दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे, उपाध्यक्ष सुहास तावडे व राजेंद्र तावडे, सरचिटणीस सतीश तावडे, खजिनदार प्रदीप तावडे, उपखजिनदार स्नेहा तावडे, विजय तावडे, सुबोध तावडे, आर्किटेक्ट गणपत तावडे, दिलीप तावडे, विश्वनाथ तावडे, सहदेव तावडे, अलका तावडे, अतुल तावडे, श्वेता तावडे, शेखर तावडे, युवा अध्यक्ष सुधीर तावडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सभासद, आडिवरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच तावडे यांची गावे असलेल्या वाडा, विलये, वालये येथील तावडे बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईतील मान्यवर तावडे मंडळी या कार्यक्रमात आवर्जून सहभागी झाले. दोन्ही दिवशी कार्यक्रम उत्तम रितीने सुनियोजित व्यवस्थेमुळे पार पडले. Bhoomipujan of the temple at Adivare


या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेली मुंबईतील आघाडीची अभिनेत्री तितिक्षा तावडे ही या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. यावेळी तावडे यांच्या युवा पिढीने तावडे हितवर्धक मंडळात सक्रिय व्हावे आणि मंडळ, समाजासाठी योगदान द्यावे, असे तिने आवाहन केले. तिची प्रकट मुलाखत आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी सुरेख घेतली. Bhoomipujan of the temple at Adivare