गुहागर भाजपाचा आक्रमक पवित्रा; १५ दिवसात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील विकसनशील बाजारपेठ असणाऱ्या आबलोली येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या कारभाराबाबत सर्व परिसरातील बँक ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही नाराजी लक्षात घेऊन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीने याबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून पुढील १५ दिवसात बॅंकेची इंटरनेट सेवा व बँकेचा कारभार सुरळीत न झाल्यास बँकेच्या मुख्य द्वारापाशीच बसून आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश विश्वनाथ सुर्वे यांनी दिला आहे. Bank of India Aabloli Mismanagement
आबलोली हे गाव पडवे जिल्हा परिषद गटातील मध्यवर्ती ठिकाण आहे. याठिकाणी प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, इंग्रजी माध्यम शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पोस्टाचे मुख्यालय, विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, लॅबोरेटरीज, इमारत साहित्याची बाजारपेठ, विकसनशील भाजी मार्केट, मच्छी मार्केट, सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, विविध गावातुन या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी होणारी मोठ्या प्रमाणातील प्रवासी वाहतुक यामुळे या गावाला आणि येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला अन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, बँक ऑफ इंडिया शाखेत गेले अनेक दिवस खंडित होणाऱ्या इंटरनेट सुविधेमुळे २० ते २५ किलोमीटर वरून येणाऱ्या खातेदारांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्या हजार रुपयांच्या कामासाठी सुद्धा ग्राहकांना तीन ते चार वेळा बँकेत फे-या माराव्या लागत आहे. त्यामुळे आमचीच बचत काढण्यासाठी आम्हालाच आर्थिक आणि वेळेचा भुर्दंड अशी भावना ग्राहकांची झाली आहे. Bank of India Aabloli Mismanagement


अनेक दिवसापासून केवायसीसाठी कागदपत्रे घेऊन सुद्धा खातेदारांच्या केवायसी पूर्ण अपलोड झालेल्या नाहीत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना अनेक अडचणी येत आहे. याशिवाय केवायसीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे बँकेत दिली असताना ती गहाळ व्हायच्या घटना सुद्धा वारंवार घडत आहे. यामुळे बँक ऑफ इंडिया शाखेच्या ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही व्यक्त होणारी नाराजी लक्ष्यात घेऊन भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेत येथील अधिकाऱ्यांना जाब विचारला. Bank of India Aabloli Mismanagement
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, पंचायत समिती सदस्य विजय भुवड, विक्रांत पागडे, विनायक सुर्वे, मासुचे माजी सरपंच विजय मसुरकर, पांडुरंग नाचरे, बाळा राणे, कीरण गडदे आदिंसह अनेक बँक ग्राहक यावेळी उपस्थित होते. Bank of India Aabloli Mismanagement