नवीदिल्ली, ता. 28 : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे. या दोन देशांमध्ये मोठं काहीतरी घडू शकतं, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सकाळीच लष्करप्रमुखांशी चर्चा केली. त्यानंतर ते थेट लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांनी नरेंद्र मोदींशी चर्चा केली. Attack on tourists at Pahalgam
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना पहलगाम हल्ल्यानंतरची परिस्थिती आणि लष्कराच्या मोहिमेबाबत माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. राजनाथ सिंह आणि पंतप्रधान मोदी यांच्यात जवळपास ४० मिनिटे सखोल चर्चा झाली. राजनाथ सिंह यांनी मोदी यांच्याशी चर्चा केली. पहलगाम हल्ल्यानंतर तेथे सुरू असलेली मोहीम आणि सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. त्याआधी सोमवारी सकाळीच संरक्षण मंत्री साउथ ब्लॉकला गेले होते. तेथे त्यांना लष्करप्रमुखांनी लष्कराच्या मोहिमेची माहिती विस्तृतपणे दिली. Attack on tourists at Pahalgam


पहलगाम हल्ल्यानंतर सर्व स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसते. हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर काही तासांतच केंद्र सरकारने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधु जल कराराला स्थगिती दिली. तसेच, भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात जाण्याचे आदेश दिले. दुसरीकडे, मोठं काही तरी घडणार आहे, अशी चर्चा जगभरात सुरू झाली आहे. भारताकडून दहशतवाद्यांना मोठा तडाखा दिला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीपासून सीमाभागापर्यंत सर्व यंत्रणा हायअलर्टवर आहेत. Attack on tourists at Pahalgam