महायुतीतर्फे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधवांना उमेदवारी मिळावी; साहिल आरेकर
गुहागर, ता. 01 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या पडद्यामागे बैठका पार पडत आहेत. कोणता पक्ष कुठल्या आणि किती जागांवर लढेल? याबाबत या बैठकींमध्ये ठरवलं जात आहे. असं असताना काही मतदारसंघांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच होताना बघायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना यांनी दावा केलेल्या गुहागर मतदार संघावार आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सेक्रेटरी साहिल आरेकर यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांना या मतदार संघातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी कार्यकर्त्यांच्यावतीने केली आहे. Assembly Elections
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी गुहागर मतदार संघावर दावा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मतदार संघावार आपला दावा केला आहे. या मतदार संघात गेले दोन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आला आहे. 2019 च्या निवडणुकीत आ. भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने याठिकाणी राष्ट्रवादीकडून बाहेरील उमेदवार असूनही 51 हजार मते पक्षाला पडली. या पडत्या काळात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी संघटना टिकवून ठेवली. मागील मतांचा विचार करता हा मतदार संघ महायुती म्हणून अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, अशी मागणी साहिल आरेकर यांनी केली आहे. Assembly Elections
जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव हे 1990 सालापासून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. 1992 मध्ये पंचायत समिती सदस्य, 1999 ला शरद पवार यांनी काढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले. 2004 मध्ये रामदास कदम यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली. यामध्ये त्यांचा पराभव झाला असला तरी चांगली मते त्यांनी घेतली. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अनेक वर्ष संचालक, तर 10 वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. जिल्ह्यात पक्ष प्रमुख म्हणून सर्वच निवडणुकामध्ये प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे. राज्यात सत्ता नसताना जिल्ह्यात राष्ट्रवादी टिकवून ठेवली. या मतदार संघातून जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली असल्याचे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सेक्रेटरी साहिल आरेकर यांनी सांगितले. Assembly Elections