उच्च न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती, जामीन मंजूर
गुहागर, ता. 23 : गुहागर तालुक्यातील असगोली खारवीवाडी येथील विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम 306(आत्महत्येस प्रवृत्त करणे) अन्वये दोषी ठरवून 10 वर्षे सक्तजुरीची शिक्षा ठोठावलेल्या आरोपी हिरा नाटेकर , प्रतिभा नाटेकर, व पुष्पा जांभारकर यांनी ॲड. संदिप आग्रे यांचेमार्फत सदर शिक्षेस आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सदर आरोपींना जामीन मंजूर केला असून शिक्षेस स्थगिती दिली आहे. Asgoli women granted bail
सप्टेंबर 2017 मध्ये असगोली येथे ही घटना घडली होती. या प्रकरणात मयत विवाहित महिलेचा मृत्यूपूर्वक जबाब व तिच्या पती सह 9 जणांची साक्ष महत्त्वाची ठरली होती. विवाहितेने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. यामध्ये ती 90 टक्के भाजली होती. सासू, जावू, नणंद, या तिघींनी मिळून विवाहितेचा छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यानुसार आरोपी विरुद्ध भा. द. सं. कलम 306, 498अ ,504,34 अन्वये गुहागर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा खटला चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयामधे सुनावणी होऊन माननीय न्यायालयाने विवाहितेचा मृत्यूपूर्व जबाब, विवाहितेच्या पतीचा जबाब तसेच डॉक्टरांची साक्ष विचारात घेऊन विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणे व छळ करणे या बाबी सिद्ध झाल्याचे निरीक्षण नोंदवून आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठवण्यात आली होती. Asgoli women granted bail
आरोपी महिलांनी सदर शिक्षेस उच्च न्यायालय मुंबई येथे आव्हान याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर दिनांक 14 मार्च 2024 रोजी सुनावणी करण्यात आली. सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने ॲड. प्रशांत ठोंबरे व ॲड. संदीप आग्रे यांनी युक्तिवाद करताना ज्या कलम 306 नुसार(आत्महत्येस प्रवृत्त करणे) व कलम 498अ, (विवाहितेचा छळ)दोषी ठरवण्यात आले होते. ते प्रथमदर्शनी आत्महत्येस प्रवृत्त करणे या गुन्ह्याच्या आवश्यक असणाऱ्या घटकांच्या कक्षेत बसणारे नसल्याचे मा. उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिर्णयाद्वारे व आपल्या युक्तीवादाद्वारे पटवून दिले. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. उच्च न्यायालयाने तीनही महिला आरोपींची 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका करण्याचे आदेश देऊन शिक्षेस स्थगिती दिली. सदरच्या खटल्यामध्ये ॲड. श्वेता वरडकर, ॲड.मोहीन खान, ॲड. सुयोग वेस्विकर यांचे सहकार्य लाभले. Asgoli women granted bail