मुंबईत जमले २००८-०९ चे माजी विद्यार्थी
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील तळवली येथील दहावी बॅच २००८-०९ च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि. २ मार्च २०२५ रोजी एम आय जी क्रिकेट क्लब वांद्रे, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल १५ वर्षांनंतर सर्व विद्यार्थी एकत्र येऊन शालेय आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र जमले. या कार्यक्रमात ४० ते ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. Alumni reunion of Talvali
या स्नेहमेळाव्यात अनेक वर्षांनी भेट झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेतील माजी शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि राष्ट्रगीताने झाली. यानंतर, बॅचच्या मागील दहा वर्षांत राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. उपस्थित मित्र-मैत्रिणींनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला तसेच दहावी नंतरच्या प्रवासाबद्दल अनुभव सांगितले. Alumni reunion of Talvali


मेळाव्याचा उत्साह वाढवण्यासाठी प्रश्नमंजुषा, विविध खेळ आणि शाळेतील जुन्या आठवणी व केलेली मज्जा मस्ती माहिती ह्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. जुन्या आठवणींना उजाळा देत मराठी गाण्यांच्या तालावर उपस्थित मित्र–मैत्रिणींनी आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थितांनी चहा-नाश्ता आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला. यावेळी सर्वांनी नेहमी एकत्र राहण्याचा आणि भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. शेवटी, राज्यगीत आणि ‘वंदे मातरम’च्या सामूहिक गायनाने मेळाव्याची सांगता करण्यात आली. या स्नेहमेळाव्यामुळे मैत्रीतील नाते अधिक दृढ झाले आणि आगामी काळात पुन्हा एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला. Alumni reunion of Talvali