गुहागर, ता. 08 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ०१ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने ‘एड्स जागृती दिवस’ साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महिला विकास कक्ष यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात शृंगारतळी येथील प्रसिद्ध असलेल्या प्रो लाईफ हॉस्पिटलच्या संचालिका आणि नेत्रविकार तज्ञ डॉ. अश्विनी ओक यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपले विचार व्यक्त केले. AIDS Awareness Day at Patpanhale College
कार्यक्रमाच्या सुरवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांनी डॉ. अश्विनी ओक यांचे स्वागत केले. त्याचवेळी आपल्या मनोगतात त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून या रोगाबाबत कराव्या लागणाऱ्या जागृतीसाठी महाविद्यालयात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती दिली. डॉ. अश्विनी ओक यांनी आपल्या मनोगतात एड्स या आजाराच्या उगमाची माहिती देताना एच आय व्ही आणि एड्स यांचा अर्थ आणि एड्सची लक्षणे याबाबत सविस्तर माहिती दिली. एड्स हा टाळता येऊ शकणारा आजार आहे. मात्र त्याबद्दलची जाणीव जागृती समाजात कमी आहे ती वाढली पाहिजे व त्यासाठी तरुणांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या. सरकार कडून या रोगाचा प्रसार रोखण्याकरिता विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याला समाजाने प्रतिसाद देणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे समाजात एच आय व्ही ग्रस्तांसाठी सहानुभूतीची भावना वाढली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी विचारलेल्या शंकांचे निरसन डॉ. ओक यांनी केले. AIDS Awareness Day at Patpanhale College
या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील डॉ. सुभाष खोत, डॉ. दिनेश पारखे, ग्रंथपाल धनंजय गुरव, डॉ. प्रमोद देसाई, प्रा. लंकेश गजभिये, डॉ. जालिंदर जाधव आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थिनी कु. ईश्वरी संसारे हिने केले. डॉ. प्रसाद भागवत यांनी प्रास्ताविक तर प्रा. सौम्या चौघुले यांनी आभार प्रदर्शन केले. AIDS Awareness Day at Patpanhale College