गुहागर, ता. 03 : तालुक्यातील कुंडली बौद्धवाडी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास कुडली बंदरवाडी येथे राहणारा जितेश राजेंद्र काजरोळकर हा त्याच्या मालकीची महिंद्रा सुप्रो गाडी घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक बसली आणि त्या झालेल्या अपघातामध्ये मोटर सायकलस्वार अरुण चंद्रकांत सुर्वे हा गंभीररित्या जखमी होऊन जागीच मयत झाला आणि त्याचे पाठीमागील सीटवर बसलेली त्याची बहीण मानसी मंगेश सुर्वे ही गंभीररित्या जखमी झाली होती. याबाबतची पोलिसांनी संशयित आरोपी जितेश राजेंद्र काजरोळकर याचे विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 304 अ, 279, 337, 338 आणि मोटार वाहन कायद्याचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचे तपास काम पूर्ण करून गुहागर पोलिसांनी सुप्रो चालकाविरुद्ध गुहागर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. Acquittal of driver who caused death


सदरच्या खटल्याचे कामकाज गुहागर फौजदारी न्यायालयामध्ये सलग तीन वर्ष चालू होते. या केसच्या सुनावणी दरम्यान संशयित आरोपी जितेश काजरोळकर याच्या वतीने ॲड.संकेत साळवी यांनी न्यायालयासमोर त्याची बाजू मांडली. सरकारी पक्षाच्यावतीने या केसच्या सुनावणी दरम्यान एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. या साक्षीदारांच्या जबाबामधून, मोटर सायकल स्वार हा त्याच्या बहिणीला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी अत्यंत वेगाने गाडी चालवून जात असताना त्याच्या चुकीमुळे सदरचा अपघात झाल्या असण्याची शक्यता ॲड.संकेत साळवी यांनी समोर आणली. सदरचा अपघात झाला त्यावेळी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू असल्याने कोणतीच एसटी बस सेवा सुरू नव्हती. त्यामुळे कुडली खाडी पार करून जयगड येथे कॉलेजला जाण्यासाठी मयत दुचाकी स्वार हा अत्यंत वेगाने गाडी चालवत होता. अशी बाब साक्षीदारांच्या कथनातून समोर आली. Acquittal of driver who caused death
त्याचप्रमाणे सकाळच्या सुमारास त्या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या लोकांचे जबाब देखील पोलिसांनी योग्यरीत्या नोंदवले नाहीत तसेच सदर अपघाताच्या पंचनाम्यामध्ये असंख्य तांत्रिक त्रुटी असल्याची बाब ॲड. संकेत साळवी यांनी न्यायालयासमोर प्रखरपणे मांडली. पोलीस तपासामधील तांत्रिक त्रुटी आणि ॲड.संकेत साळवी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून गुहागर फौजदारी न्यायालयाने संशयित आरोपी जितेश काजरोळकर याची या अपघाताच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. या केसच्या सुनावणी दरम्यान ॲड.संकेत साळवी यांना ॲड.अलंकार विखारे, ॲड.सुप्रिया वाघदरे, ॲड. मानसी सोमण, ॲड.रोशनी पवार यांनी सहकार्य केले. Acquittal of driver who caused death