रात्रीच्या वेळी म्हैशीवर दुचाकी आदळली, एक गंभीर
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील काताळे गावातील निखिल दिलीप कुळ्ये या 23 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेला साहिल अजित कुळये यांच्या डोक्याला मार लागला असून डेरवण येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. शुक्रवारी (ता 13) रात्री 12 च्या सुमारास पडवे कातळावर दुचाकी म्हैशींवर आदळून हा अपघात झाला. निखिलच्या मृत्यूने काताळे गावावर शोककळा पसरली आहे. Accidental death of youth
शुक्रवारी (ता 13) रात्री निखिल आणि साहील आपल्या मित्रांसह तीन दुचाकी घेवून भजनासाठी रोहीले गावात गेले होते. भजनाचा कार्यक्रम झाल्यावर निखिल आणि साहील दुचाकीवरुन काताळे गावी परत येत होते. पडवे फाट्यावरुन काताळेच्या दिशेने दुचाकी जात असताना पडवे हायस्कुलजवळ रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडणारी म्हैस दुचाकी चालवणाऱ्या निखिलला दिसली नाही. निखिलची दुचाकी म्हैशींवर आदळली. दुचाकी धडकल्यावर निखिल आणि साहील दोघेही रस्त्यावर आदळले. निखिल जागीच बेशुद्ध पडला. पाठीमागुन येणाऱ्या निखिल, साहील सोबतच्या मित्रांनी हा अपघात पाहीला. तातडीने काताळे गावात संपर्क केला. निखिल व साहीलला मित्र तत्काळ आबलोली प्राथमिक उपकेंद्रात घेऊन गेले. तेथून त्यांना डेरवण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डेरवण येथे पोचेपर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता. साहीलच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागला असून त्याच्यावर डेरवण येथे उपचार सुरु आहेत. Accidental death of youth
डेरवण येथील रुग्णालयातच शवविच्छेदन करुन निखिलचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आज (ता. 14) दुपारी शोकाकुल वातावरणात निखिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. निखिल विरार येथे रहात होता. तेथील एका दुचाकी वाहनांच्या विक्री व सेवाकेंद्रात तो नोकरीला होता. गौरीगणपतीसाठी तो गावी आला होता. 23 वर्षीय निखिल हा एकमेव तरुण मुलगा हरपल्याने दिलीप कुळ्येंच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. Accidental death of youth
दरम्यान रात्रीच्या वेळी दुचाकीने धडक दिलेली म्हैस ही सुर्वे यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. ही म्हैस देखील या अपघातानंतर मृत पावली आहे. मात्र या अपघाताची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात अद्याप झालेली नाही. सावर्डे येथील पोलीस ठाण्यातून या अपघाताची नोंद शुन्य क्रमांकाने गुहागर पोलीस ठाण्यात दाखल होईल. Accidental death of youth