गुहागर, ता. 18 : भारतीय नौदलाची निवृत्त झालेली युद्धनौका आयएनएस गुलदार ही दि. १८ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि वेंगुर्ला जवळील निवती लाइट हाऊस येथील समुद्रात बुडविण्यात येणार असून ही युद्धनौका पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ रीफ मध्ये रूपांतरित होणार आहे. आज विजयदुर्ग बंदरातून टगच्या साहाय्याने टोईंग करून निवती लाईटहाऊस येथे ही युद्धनौका नेण्यात येत आहे. हा महत्वाकांक्षी पर्यटन प्रकल्प भारताच्या सागरी पर्यटनाच्या इतिहासात ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. तसेच इतिहासप्रेमींना, स्कुबा डायव्हर्स यांच्यासह सागरी पर्यटन व पर्यावरण संवर्धनासाठी देखील महत्त्वाचा ठरणार आहे. Guldar will be given a water burial
सन १९८५ मध्ये पोलंडमधील ग्डिनीया शिपयार्ड येथे गुलदार ही युद्धनौका बांधण्यात आली होती. उंची २२ मी., लांबी ८३.९ मी. असलेली ही युद्ध नौका ३० डिसेंबर १९८५ रोजी भारतीय नौदलात समाविष्ट झाली. आयएनएस गुलदार ही कुंभीर – वर्गातील लँडिंग शिप होती. उभयचर मोहिमांसाठी डिझाइन केलेले हे जहाज टाक्या, सैन्य व सामग्री किनार्यांवर उतरवण्यासाठी वापरले जात असे. आपल्या ४० वर्षांच्या सेवाकाळात या युद्धनौकेने तब्बल ४९० लँडिंग ऑपरेशन्स पार पाडले आणि ३,९०० दिवस समुद्रात घालवले. श्रीलंकेत शांतता मिशन, तस्करीविरोधी मोहिमा, तसेच १९९७ चे चक्रीवादळ आणि २००४ च्या त्सुनामीनंतरची आपत्ती निवारण मदत अशा अनेक महत्वपूर्ण भूमिका याने पार पाडल्या. १२ जानेवारी २०२४ रोजी, आयएनएस चित्ता आणि कुंभीर या सहकारी जहाजांसह, गुलदारने औपचारिक निवृत्ती घेतली. Guldar will be given a water burial

निवृत्त झाल्यानंतर ही युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. गुलदार युद्धनौका वेंगुर्ला निवती समोरील निवती लाईट हाऊसच्या खडकाळ समुद्रात बुडवून स्कुबा डायविंगसारख्या जलपर्यटनास नवा आयाम देण्यात येणार आहे. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) या प्रकल्पाचे नेतृत्व करत असून, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या विशेष सहाय्य योजनेतून ४६.९१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. १५ मार्च २०२५ रोजी ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात दाखल झाली होती. १४ महिन्यांनंतर रविवारी सायंकाळी विजयदुर्ग बंदरातून वेंगुर्लेकडे रवाना झाली. वेंगुर्ले येथे हलविण्यापूर्वी जहाजातील सर्व साहित्य काढून ते पूर्णपणे रिकामे करण्यात आले. वेंगुर्ले निवती येथील लाईट हाऊस परिसरात २५ मीटर खोल समुद्रात नियोजितपणे ही युद्धनौका बुडवून पाण्याखालील पर्यटन विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला नवी दिशा मिळणार आहे. Guldar will be given a water burial
