गुहागर, ता. 24 : प्रयागराज येथे सुरू असलेल्या पवित्र महाकुंभ पर्वात आतापर्यंत ६० कोटींहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. मात्र काही कारणानी सर्वांनाच यात सहभागी होता येत नाही. त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात अनुलोम तर्फे महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. गुहागर तालुक्यातील अडूर येथील श्री विठ्ठलाईदेवी मंदिरात काल रविवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी या महाकुंभ तीर्थ कलशाची जागृत देवता श्री विठ्ठलाईदेवी मंदिरात दर्शन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. Mahakumbh Darshan ceremony at Adur


मंदिरामध्ये सजवलेल्या चौरंगावर या अमृत कलशाला स्थानापन्न करून त्याचे पूजन गावातील जेष्ठ नागरिक श्री. यशवंत धावडे व सौ. विजया धावडे या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आले. तीर्थ कलशाचे पूजन झाल्यानंतर उपस्थित जोडप्यांनी व अन्य भाविकांनी कलशाचे पूजन केले. शेवटी आरती करण्यात आली व नंतर सर्वांनी दर्शन घेतले, प्रसाद वाटप करण्यात आले. अनुलोमचे गुहागर तालुका विभागप्रमुख व दैनिक सकाळचे पत्रकार मयुरेश पाटणकर, अनुलोम वस्ती मित्र दिनेश खेडेकर, कार्यक्रम समिती सदस्य गोपाळ झगडे, विपुल नार्वेकर, दिनेश देवळे व श्री. विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ अडूर च्या महिला व पुरुष वर्गाने कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. Mahakumbh Darshan ceremony at Adur


अनुलोमचे गुहागर तालुका विभागप्रमुख, मयुरेश पाटणकर यांनी उपस्थितांना प्रयागराज मधील महाकुंभाची भव्यता याविषयी सविस्तर विवेचन केले. प्रयागराज येथील कुंभमेळा, हिंदूंचे एकत्रीकरण यासंदर्भात बहुमोल माहिती दिली. देव, देश, धर्मासाठी योगदान व रक्षण केलं पाहिजे, असा संदेश महाकुंभ पर्वणीने दिला आहे. अनुलोमच्या प्रयत्नातून तीर्थ दर्शनाचा लाभ मिळाला. अनुलोम ही समाजामध्ये सकारात्मक विचार करणारी संघटना आहे. समाजातील प्रत्येक घटकामध्ये बदल व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. प्रयागराजमध्ये १४४ वर्षांनंतर महाकुंभ होत आहे. त्रिवेणी संगमावर ज्यांना जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी महाकुंभ तीर्थ दर्शन कार्यक्रम महाराष्ट्रात राबवला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांतही याचे नियोजन केले जात आहे, तरी त्याचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. Mahakumbh Darshan ceremony at Adur