अनय जोगळेकर, डॉ. सच्चिदानंद शेवडे देणार व्याख्यान
रत्नागिरी, ता. 03 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने यंदापासून रत्नागिरीचे सांस्कृतिक आणि वैचारिक विश्व समृद्ध करणारी दर्पणकार (कै.) बाळशास्त्री जांभेकर स्मृती व्याख्यानमाला सुरू करण्याचे ठरवले आहे. मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून येत्या ५ व ६ जानेवारीला व्याख्यानमाला रंगणार आहे. राजकारणाचे अभ्यासक, पत्रकार, वक्ते अनय रवींद्र जोगळेकर आणि लेखक, प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे यात व्याख्यान देणार आहेत. राणी लक्ष्मीबाई सभागृहात ही व्याख्यानमाला सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे. या व्याख्यानमालेला रत्नागिरीकरांनी आवर्जून यावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये यांनी केले आहे. Lecture series by Karhade Brahmin Sangh
अनय जोगळेकर ५ जानेवारीला अस्वस्थ वर्तमान या विषयावर व्याख्यान देणार आहेत. आपल्या मनात असंख्य प्रश्नांची वादळे घोंगावतात. वरकरणी दिसत असलेल्या घटना प्रसंगाच्या पाठी काही अदृश्य कंगोरे लपलेले असतात. मग आपण अधिकच गोंधळून जातो. हे अस्वस्थ वर्तमान काय आहे यावर जोगळेकर बोलतील. ते मुंबईतील वाणिज्य दूतावासात राजकीय संबंध आणि विशेष प्रकल्प अधिकारी २००६ पासून कार्यरत असून २०१० ते १४ या काळात ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये संलग्न संशोधक म्हणून काम केले आहे. महाराष्ट्रासाठी माहिती तंत्रज्ञान, मराठीतून माहिती तंत्रज्ञान या अहवालाचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते अनावरण झाले. डिजिटल क्षेत्रात मराठी, सोशल मिडिया तसेच महाराष्ट्राच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या महाराष्ट्र अध्ययन केंद्राच्या कामात सहभाग आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, साप्ताहिक विवेक आणि मुंबई तरुण भारत, लोकमत, सामना आदी वृत्तपत्रांमध्ये लिखाण करतात. मराठी वाहिन्यांवरील चर्चांमध्ये विश्लेषक म्हणून सहभागी असतात. त्यांचे एमएच ४८ नावाचे युट्युब चॅनल असून महाराष्ट्राच्या आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरील विश्लेषण करतात. Lecture series by Karhade Brahmin Sangh
माझा मराठाचि बोलू कौतुकें | परि अमृतातेंही पैजा जिंके || या विषयावर ६ जानेवारीला डॉ. सच्चिदानंद शेवडे व्याख्यान देतील. त्यांचे शिक्षण एम.फील.,पी.एच.डी. असून त्यांचे अध्यात्मिक गुरू प.पू.ब्र.स्वामी वरदानंद भारती आहेत. उत्तम व्याख्याता, प्रवचनकार, निरुपणकार आणि साहित्यिक असा दुर्मिळ असणारा संगम असणारे डॉ. शेवडे व्याख्यान देणार आहेत. त्यांनी गेल्या ४० वर्षात भारत आणि विदेशात मिळून एकूण ६००० च्या वर कार्यक्रम केले असून त्यांची महानाट्य, नाटक, कादंबरी, ललित चरित्रे, बालसाहित्य, कुमार साहित्य, ऐतिहासिक यावरील ५१ पुस्तके प्रकाशित आहेत. यातील काही पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहेत. जहाज, विमान व बसमध्ये व्याख्याने देण्याची अनोखी कामगिरी त्यांनी केली आहे. सेल्युलर तुरुंगात व्याख्यान देणारे हे पहिलेच वक्ते आहेत. विविध नामांकित संस्थांचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. गेली १२ वर्षे सातत्याने तेथे, सावरकर स्मृतीदिनी व्याख्यान देतात. विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत ते सहभाग होत असतात. त्यांचे व्याख्यान रत्नागिरीकरांना पर्वणी ठरणार आहे. Lecture series by Karhade Brahmin Sangh
६ रोजी दर्पण पुरस्काराचे वितरण
मराठी पत्रकार दिनी ६ जानेवारीला रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या मानाच्या दर्पण पुरस्काराचे वितरण पत्रकार अनिकेत बाळकृष्ण कोनकर यांना डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात येणार आहे. अनिकेत कोनकर बीएस्सी अॅग्रिकल्चर आणि मास्टर ऑफ जर्नालिझम पदवीप्राप्त असून २००८ पासून कार्यरत आहेत. सकाळ अॅग्रोवन, महाराष्ट्र टाईम्समध्ये उपसंपादक, पुणे आकाशवाणीत हंगामी वृत्त निवेदक म्हणून काम केले आहे. २०१७ पासून बाईट्स ऑफ इंडियाचे संपादक व आता ‘स्टोरीटेलर्स’ या कंपनीत मुख्य उपसंपादक आहेत. यापूर्वी त्यांना २०१८ साली महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे सोशल मीडिया विभागाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे. Lecture series by Karhade Brahmin Sangh