संस्कृत भाषेत रंगणार कार्यक्रम, आगामी कार्याची दिशाही ठरणार
गुहागर, ता. 06 : संस्कृतभारतीच्या कोंकणप्रांताचे संमेलन यावर्षी दिनांक ९ व १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत श्री क्षेत्र परशुराम येथील एस.पी.एम. इंग्लिश मिडियम स्कूल, परशुराम, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे. मुंबई ते गोवा या कोकणप्रांतातील संस्कृतशिक्षक, संस्कृतभाषेची सेवा करणारे सुमारे ३०० कार्यकर्ते या संमेलनात सहभागी होणार आहेत. एस.पी.एम. इंग्लिश मिडियम स्कूल व संस्थान श्री भार्गवराम परशुराम न्यासाच्या महत्त्वपूर्ण सहयोगातून हे संमेलन आयोजित होत आहे. Provincial Conference of Sanskrit Bharati at Chiplun
संस्कृतभारती ही संस्कृत भाषेसाठी शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी एक विश्वव्यापी संस्था आहे. संस्कृतभाषा ही भारतीय संस्कृतीची वाहिका आहे. भारतीय संस्कार या भाषेच्या अध्ययनाने सहजपणे समाजात रुजतात. संस्कारयुक्त कुटुंब हा समाजाचा कणा आहे. संस्कृतभाषा जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे व भारतीय संस्कृतीचे जतन करणे ह्या उदात्त हेतूने संस्कृतभारती काम करते. दर तीन वर्षांनी होणारे प्रांतसंमेलन हा संस्कृतभारतीच्या कार्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. यानिमित्ताने मुंबई ते गोवा या कोकणपट्ट्यातील संस्कृत शिक्षक, संस्कृतभारतीचे कार्यकर्ते एकत्र येतात. प्रांतातील कामाचा आढावा घेतात. पुढील कार्याची दिशा ठरवतात. यावेळी हे संमेलन चिपळूणमध्ये होत आहे. Provincial Conference of Sanskrit Bharati at Chiplun
या संमेलनामध्ये विज्ञानप्रदर्शिनी, वस्तुप्रदर्शिनी, भारतीयज्ञानप्रदर्शिनी, अर्थशास्त्रप्रदर्शिनी, अशा वैविध्यपूर्ण गोष्टींसोबतच उद्बोधक सत्रे व सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. त्याचप्रमाणे कार्यकर्ता विकास, संस्कृतमधील प्रेरक कथा, इ. विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. कर्नाटक राज्यातील उच्च शिक्षण विभागाचे निवृत्त संचालक प्रो. टी. एन. प्रभाकर यांचे ‘कुटुंबप्रबोधन’ या विषयावर विशेष उद्बोधन या संमेलनात होणार आहे. दि. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:४५ ते ९:०० या वेळेत चिपळूणमधील कलाकार संस्कृत गीते, स्तोत्रे, अनुवादित राष्ट्रभक्तीपर गीते व बालगीतांचे सादरीकरण करणार आहेत. Provincial Conference of Sanskrit Bharati at Chiplun
या संमेलनाचे उद्घाटन स्वागत समितीचे अध्यक्ष अॅड. जीवन रेळेकर (अध्यक्ष, श्री भार्गवराम, परशुराम संस्थान), उपाध्यक्ष लोटे येथील उद्योजक प्रशांत पटवर्धन, डी.बी.जे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. माधव बापट, ज्येष्ठ संस्कृत शिक्षिका सौ. शीला केतकर, विद्याभारती चे डॉ. अश्विनी तेजानंद गणपत्ये, प्रवचनकार धनंजय चितळे व आय्.एम्.एस.सी.सी.आर्. च्या समन्वयक सौ. अर्चना बक्षी यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती संस्कृती भारतीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक मुकेश बामणे यांनी दिली आहे. Provincial Conference of Sanskrit Bharati at Chiplun