निलेश सुर्वे, नाराजी, राग हा संघटनेअंतर्गत मुद्दा
गुहागर, ता. 29 : मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीने गुहागरात भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते. मात्र दुपारी 11 च्या दरम्यान जिल्हाध्यक्षांचा निरोप आल्याने अर्ज भरणे रद्द झाले. पुढील दोन दिवसात पालकमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत महायुतीची समन्वय बैठक होईल. त्यानंतर गुहागर मतदारसंघातील भाजपचे कायकर्ते महायुतीचा प्रचार संपूर्ण ताकदीनिशी करतील. असे गुहागरचे भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी सांगितले. BJP will promote grand Alliance
गुहागरमध्ये आज भाजपच्या तिन्ही तालुकाध्यक्षांसह कार्यकर्त्यांची सभा झाली. या सभेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना नीलेश सुर्वे म्हणाले की, गेली दोन अडीच वर्ष भाजपच्या वरिष्ठांच्या सांगण्यावरुन आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली. गुहागर, चिपळूण आणि खेड तालुक्यात पसरलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघात 322 मतदान केंद्र आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर आम्ही भाजपचे संघटनात्मक काम उभे केले. लोकसभा निवडणुकीनंतर डॉ. विनय नातु यांच्या नेतृत्त्वात विधानसभा लढण्यासाठी नियोजन केले होते. मात्र अचानक मंत्री रविंद्र चव्हाण आमच्या सांत्वनासाठी इथे आले. तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती. परंतु सोमवारी रात्रीपर्यंत गुहागरची विधानसभा महायुतीतर्फे कोण लढणार याची अधिकृत माहिती मिळत नव्हती. त्यामुळेच भाजप म्हणून विधानसभा मतदारसंघातून नीलेश सुर्वेंनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय झाला. उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली. मात्र आज सकाळी जिल्हाध्यक्षांकडून महायुतीतर्फे राजेश बेंडल शिवसेनेच्या वतीने उमेदवार असतील असे सांगण्यात आले. त्यामुळे अर्ज भरण्याचा विषय आम्ही रद्द केला. BJP will promote grand Alliance
सोमवारी राजेश बेंडल यांनी महायुतीतर्फे अर्ज भरला असला तरी त्याची अधिकृत माहिती आम्हाला मिळाली नव्हती. म्हणून काल आम्ही अधिकृतरित्या राजेश बेंडल यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीत सहभागी झालो नव्हतो. भाजपचे काही कार्यकर्ते, पदाधिकारी कालच्या मिरवणुकीत होते ती त्यांची व्यक्तिगत भुमिका होती. आता अधिकृत निरोप आल्यानंतर आम्ही ताकदीनिशी महायुतीच्या प्रचारात उतरणार आहोत. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष म्हणून भाजपच प्रचाराचे नेतृत्त्वही करेल. दोन दिवसांत समन्वयाची बैठक होईल. BJP will promote grand Alliance
आमची नाराजी व राग आमच्या संघटनेतंर्गत बाब आहे. महायुतीतील घटक पक्षांवर आम्ही नाराज नव्हतो. आम्हाला तयारी करायला सांगून नंतर अचानक थांबायला सांगितले गेल्याने भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी वरिष्ठांवर नाराज आहेत. ही नाराजी आम्ही नेत्यांजवळ बोलुनही दाखवली आहे. आमच्या अंतर्गत बाबींचा कोणताही परिणाम महायुतीच्या प्रचारावर होणार नाही. असेही नीलेश सुर्वे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे, अजित थरवळ, तिन्ही तालुक्यांचे सरचिटणीस, पदाधिकारी उपस्थित होते. BJP will promote grand Alliance
माजी आमदार विनय नातू अनुपस्थित
आजच्या भाजपच्या पत्रकार परिषदेलाही माजी आमदार व विधानसभा समन्वयक डॉ. विनय नातू अनुपस्थित होते. याचे कारण सांगताना सध्या कौटुंबिक विषयात विनय नातू व्यग्र आहेत. मात्र समन्वय समितीच्या बैठकीपासून ते देखील संपूर्ण ताकदीनिशी प्रचारात सहभागी होतील. असे सुर्वे यांनी सांगितले.