उमेदवारीसाठी विपुल कदम, राजेश बेंडल, संतोष जैतापकर, शरद शिगवण, प्रमोद गांधी इच्छुक
गुहागर, ता. 19 : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच खऱ्या अर्थाने आता राजकारण ढवळून गेले आहे. यावेळची निवडणूक ही महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्वाची मानली जात आहे. एका पक्षाचे दोन राजकीय पक्ष निर्माण झाल्याने उमेदवारीवरुन मोठा गदारोळ उठण्याची शक्यता आहे. कोण कुणाच्या राजकीय तंबूत जातोय की, कोण कुणाला मदत करतोय हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गुहागर मतदार संघात दोन आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठ पणाला लागणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आ. भास्कर जाधव व भाजपचे माजी आमदार डाँ. विनय नातू महायुतीकडून आमनेसामने असणार आहेत. परंतु, महायु्तीकडून डॉ. नातू यांच्या उमेदवारीवर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. तर दुसरीकडे उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गटाचे विपुल कदम, शरद शिगवण, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे राजेश बेंडल, भाजपचे संतोष जैतापकर, मनसेचे प्रमोद गांधी इच्छुक आहेत. येत्या काही दिवसात गुहागर मतदार संघातील खरी लढत निश्चित होणार आहे. Real fight between MLAs in Guhagar
मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या भास्कर जाधव यांनी अचानक धनुष्यबाण हाती घेतल्याने भाजपचे माजी आ. डाँ. नातू यांना युतीचा धर्म पाळावा लागला आणि उमेदवारीपासून ते वंचित राहिले. साहजिकच यावेळी मात्र, डॉ. नातू यांना वरिष्ठांनी उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यानुसार, महायुतीकडून डॉ. नातू यांना गुहागरमधून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरु आहे. तसेच कार्यकर्तेही उमेदवारी मिळणार म्हणून जोमाने कामाला लागले आहेत. डॉ. नातू हे २० वर्षे गुहागरचे आमदार राहिले आहेत. जनसंघापासून ते भाजप असा प्रवास त्यांच्या घराण्याला लाभला आहे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणात गुहागर मतदार संघाची अदलाबदल झाल्याने शिवसेनेने येथील जागेवर दावा केला होता. त्यामुळेच आ. जाधव यांना मागील विधानसभेला येथून उमेदवारी मिळाली होती. आता मात्र, ही जागा पुन्हा एकदा भाजपला मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. Real fight between MLAs in Guhagar
गुहागरमध्ये आ. भास्कर जाधव यांनी आपली राजकीय पकड मजबूत ठेवली आहे. राष्ट्रवादीचे दोनवेळा आमदार तर नंतर शिवसेनेचे आमदार झालेल्या भास्कर जाधव यांना यावेळी मात्र, ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. खरी शिवसेना शिंदे गटाची असल्याने उद्ध्व ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविताना आ. जाधव यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. यावेळी नातू यांना उमेदवारी जाहीर झाली नसली तरी त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक जिल्हापरिषद गटात होम मिनिस्टरच्या माध्यमातून महिलांसाठी पैठणीचा खेळ स्पर्धा, साड्या वाटप असे उपक्रम राबवून महिला वर्गाला खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. गाठीभेटी सुरु आहेत. गुहागर मतदारसंघात खेड तालुक्यातील गावे असल्याने रामदास कदम यांनीही आम्ही भाजपला मदत करु असे सध्यातरी आश्वासन दिले आहे. त्यामुळे डॉ. नातू यांचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे. Real fight between MLAs in Guhagar
आ. जाधव यांनीही आता मतदासंघात प्रचाराला जोर दिला आहे. पक्षप्रवेश सुरुच आहेत. नुकताच वाघिवरे, खामशेत, आरे या गावांमधील काही वाड्यांनी उध्द्वव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आ. जाधव यांनाही राजकीय वातावरण सध्या तरी पोषक आहे. जाधव यांनी गुहागरमध्ये विकासाचे राजकारण केले आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त असणाऱ्या गुहागरवासियांचे मेळावे घेऊन त्यांना प्रवृत्त केले आहे. गावांचा विकास होत असल्याने काही गावे आजही आ. जाधव यांनाच मतदान करत आलेले आहेत. नुकताच त्यांनी आरजीपीपीएल कंपनीकडून थकीत असलेला कर अंजनवेल, रानवी, वेलदूर ग्रामपंचायतींना मिळवून देण्यात मोठा हातभार लावला आहे. ही एक जमेची बाजू आहे. तसेच मच्छिमारांच्या घराखालील जमिनी त्यांच्या मालकीच्या करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकूणच आ. जाधव यांच्या विकासात आताची निवडणूक महत्वाची भूमिका बजावणार आहे. असे असले तरी माजी आमदार डॉ. नातू स्वतः मैदानात उतरल्याने व आमदारकीचा अनुभव गाठीशी असल्याने त्यांनीही आपल्या पध्दतीने प्रचाराला सुरुवात केलेली दिसून येत आहे. त्यामुळे यावेळी गुहागर मतदारसंघात अधिक चुरस वाढणार आहे. Real fight between MLAs in Guhagar
मागील विधानसभा निवडणुकीत आ. जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षातर्फे सहदेव बेटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी 51 हजार मते घेतली होती. त्यामुळे महायुती मधील घटक असलेल्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्याला उमेदवारी मिळावी असा सुरु लावला आहे. याठिकाणी माजी आमदार स्व. रामभाऊ बेंडल यांचे पुत्र आणि कुणबी समाजाचे नेते, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनीही मतदारांच्या गाठी भेटी सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाचे मेहुणे असलेले विपुल कदम यांनी देखील या मतदार संघात लक्ष घातले आहे. इथल्या शिवसैनिकांमध्ये नवंचैतन्य निर्माण करण्याचे काम करत आहेत. मागील निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेचा आमदार निवडून आल्याने ही जागा शिवसेनेची आहे, असा हक्क दाखवून विपुल कदम आणि माजी पंचायत समिती सभापती शरद शिगवण इच्छुक आहेत. Real fight between MLAs in Guhagar
भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर हे गेल्या काही वर्षांपासून गुहागरचे नेतृत्व करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. निर्मलक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरु ठेवले आहे. वैद्यकीय कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. गोरगरीब नागरिकांसाठी गुहागर व मुंबईत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी झटत आहेत. आपल्या कार्यामुळे विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश करून घेतले आहेत. मतदार संघातील वाढल्या जनसंपर्कमुळं तेही इच्छुक आहेत. Real fight between MLAs in Guhagar
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुहागरचे मनसे संपर्कप्रमुख प्रमोद गांधी हे गुहागरमधून उमेदवारासाठी इच्छुक आहेत. एक तरुण, उमदे नेतृत्व व उद्योजक असल्याने गांधी यांनी आपली गुहागरमध्ये छाप पाडली आहे. अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गाठीभेटी घेतल्या असून मनसेचे कार्यकर्ते त्यांना सहकार्य करत आहेत. प्रत्येक गाव-वाडी अध्यक्षाला, सरपंच यांना पत्र पाठवून आपल्या विकासाची भूमिका मांडली आहे. एकप्रकारे त्यांनी मतदारांना यातून साद घातल्याचे दिसून येत आहे. हे सर्व इच्छुक असले तरी सर्वांनाचं खरी लढत आ. जाधव आणि डॉ. नातू यांच्यात होईल, याची खात्री वाटतं आहे. Real fight between MLAs in Guhagar