प्राचार्य डॉ. संगीता काटकर यांचे प्रतिपादन
गुहागर, ता. 26 : चिपळूण, गुहागर तालुक्यातील वाडी-वस्त्यावर राहणाऱ्या लोकांसाठी वैद्यकीय उपचार उपलब्ध करून अहोरात रुग्णसेवा करणारा धन्वंतरी स्वर्गीय डॉ. श्रीधर नातू अर्थात तात्यासाहेब नातू एक देवमाणूस होते, असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता काटकर यांनी केले. डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. सुरेश सुतार, डॉ.सत्येंद्र राजे, डॉ. प्राजक्ता शिंदे, प्राध्यापिका माने, प्रा. प्रियांका निकम, प्रा. विक्रांत टेरवकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. Memorial Day of Tatyasaheb Natu

महाविद्यालयात 25 जुलै हा दिवस डॉ. तात्यासाहेब नातू यांचा स्मृतिदिन म्हणून त्यांच्या विचारांची, कार्याची आठवण करून देणारा दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी प्राचार्य डॉ. काटकर यांनी गुहागर तालुक्यातील प्रथम आमदार असणारे स्वर्गीय डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करीत डॉ. तात्यासाहेब नातू वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतके अतिउच्च होते की, त्यांचे पेशंट हे सातारा, कराड, कोल्हापूर जिल्हाच नाही तर कर्नाटक राज्यांमधून ही उपचारासाठी येत होते, याबद्दल सांगितले. विंचुदंश, सर्पदंश सारख्या गंभीर पेशंटला आधार देत त्याला पुनर्जीवन देण्यामध्ये डॉ. तात्यासाहेब नातूंचे फार मोठे यशस्वी काम होते हेही त्यांनी सांगितले. आजकालच्या आधुनिक काळातील वैद्यकीय क्षेत्रामधील भरमसाठ फी आकारणाऱ्या डॉक्टरांनी विना मोबदला वैद्यकीय रुग्णसेवा देणाऱ्या डॉ. तात्यासाहेब नातूंचा आदर्श घेतला पाहिजे. गोरगरीब, कष्टकरी जनतेला वैद्यकीय प्रामाणिक सेवा देण्याबरोबरच गुहागर तालुक्याचे प्रथम आमदार असणाऱ्या डॉ. तात्यासाहेब नातू यांनी कोणतेही राजकारण न करता गुहागर चिपळूण तालुक्यातील लोकांची प्रामाणिकपणे सामाजिक, शैक्षणिक सेवा करीत लोकांच्या मनामध्ये आपले आढळ स्थान निर्माण केले. आजकालच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉ. तात्यासाहेब नातूच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन करीत त्यांनी त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युवराज जाधव यांनी, तर आभार प्रा. डॉ. नामदेव डोंगरे यांनी मांनले. Memorial Day of Tatyasaheb Natu