गुहागर, ता. 14 : तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार करीत गेली १२ वर्षे रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या तालुक्यातील साखरीआगर येथील मच्छीमार जेटीचे काम अद्यापही गटांगळ्या खात असल्याचे समोर आले आहे. जेटीच्या पुढील बांधकामाचे डिझाईनच तयार केलेले नसल्याने मान्यतेअभावी गेले ३ महिने जेटीचे बांधकाम ठप्प आहे. पत्तन विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका ठेकेदाराला बसला असून, बांधकामाचे साहित्य जेटीच्या ठिकाणी धूळ खात पडले आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतरच या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती ठेकेदार खामकर यांनी दिली. Construction of Sakhri Agar Jetty stalled
साखरीआगर भागातील मच्छीमारांची गैरसोय दूर करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या ठिकाणी जेटीला २०१०-११ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी तिच्या बांधकामाला २.९६ कोटी इतकी प्रशासकीय मंजुरी मिळाली. २०१२ मध्ये या जेटीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र काम सुरु झाल्यानंतर सीआरझेडची परवानगी नसल्याचा मुद्दा पुढे आल्याने संबंधित ठेकेदाराने हे काम अर्धवट स्थितीत सोडले. Construction of Sakhri Agar Jetty stalled
जेटीचे बांधकाम गेली १२ वर्षे रखडल्याने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पाठपुरावा सुरु करुन सीआरझेडची परवानगी मिळवून ८ कोटी ४३ लाखाचा निधी मंजूर केला होता. यानंतर में खामकर कंपनी यांना जुलै २०२३ मध्ये वर्कऑर्डर मिळाली. नोव्हेंबरमध्ये त्यांनी जेटीचे काम सुरु केले. मात्र जेटीच्या पुढील बांधकामाचे डिझाईनच संबंधित विभागाकडून न मिळाल्याने गेले ३ महिने जेटीचे काम ठप्प आहे. पत्तन विभागाने कन्सल्टन्ट न नेमल्याने डिझाईनचे काम रखडल्याचे व बांधकामाला मान्यता नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. Construction of Sakhri Agar Jetty stalled
साखरी आगर येथील मच्छीमारांना जेटी नसल्याने वर्षांनुवर्षे अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. जेटी नसल्याने होड्या नांगरणे, मासे उत्तरवणे शक्य होत नसल्याने परिणामी रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदराचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे साखरीआगर ते जयगड हा प्रवास, डिझेल या सर्व बाबी फारच खर्चिक असल्याने त्यांचे फारच नुकसान होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तरी जेटीचे काम होईल, अशी अपेक्षा मच्छीमारांना होती; मात्र ती फोल ठरली असून, शासनाच्या उदासीनतेबाबत मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली आहे. Construction of Sakhri Agar Jetty stalled