नितेश राणे आणि निलेश राणे यांनी केलेली मागणी योग्यच- बाळ माने
रत्नागिरी, ता. 11 : लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांच्या विजयामुळे रत्नागिरी, राजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाने दावा केला आहे. या दाव्याला समर्थन देताना त्याचा पुनरुच्चार भाजपाचे माजी आमदार व विधानसभा प्रमुख बाळ माने यांनी पत्रकारांशी बोलताना केला. भाजपाला चांगला जनाधार असून भाजपाने आपला पक्ष वाढवण्यासाठी हा दावा केला असून यात गैर काय, असेही माने यांनी स्पष्ट केले. आपला पक्ष कुणालाही मोठं झालेला पाहिजे असतो. आज परिवर्तनाचा काळ त्यामुळे, रत्नागिरी, राजापूर विधानसभेवर आमचाच दावा आहे, असे माने म्हणाले. Assembly voting
बाळ माने यांनी सांगितले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ४५ वर्षानंतर कमळ चिन्हावर निवडणूक भाजपाचा हक्काचा खासदार निवडून आला आहे. याबद्दल मी कोकणातील मतदारांचे आभार मानतो. ४५ वर्षांपूर्वी भाजपाच्या स्थापनेपूर्वीचा पक्ष म्हणजे जनसंघाचे खासदार म्हणून अॅड. बापूसाहेब परुळेकर या मतदारसंघात निवडून आले होते. परंतु युतीच्या राजकारणात भाजपाचा खासदार झाला नव्हता. आता कोकणचे नेते नारायण राणे विजयी झाले आहेत. त्यामुळे माजी खासदार नीलेश राणे व आमदार नीतेश राणे यांनी रत्नागिरी व राजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळण्याचे सांगितले होते. त्या गोष्टीचे मी समर्थन करतो. Assembly voting
श्री. माने म्हणाले की, भाजपा नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मी, तसेच खासदार राणे हे भाजपा वाढण्यासाठी काम करत आहोत. मोदी सरकार, फडणवीस सरकारने आखलेल्या विकासाच्या योजना तळागाळात पोहोचवण्याचे काम करत आहोत. कै. कुसुमताई अभ्यंकर, कै. शिवाजीराव गोताड हे माझ्यापूर्वी भाजपाचे आमदार होते. मी १९९९ ते २००४ या काळात युतीचा आमदार होतो. त्यानंतरच्या निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभव झाला तरीही गेल्या दहा वर्षांत भाजपाची हक्काची अशी ६० ते ६५ हजार मते रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाला मिळावा ही अपेक्षा ठेवणे चूक नाही. हा एक व्यूहरचनेचा भाग आहे. रत्नागिरी, राजापूर या दोन्ही जागा आम्ही जिंकू शकतो, असा विश्वास वाटतो. Assembly voting
रत्नागिरी मतदारसंघात भाजपाचा जनाधार चांगल्या पद्धतीने आहे, असा ठाम विश्वास बाळ माने यांनी व्यक्त केला. गेल्या काही निवडणुकांत रत्नागिरीमध्ये १ लाख ६० हजार ते १ लाख ७५ हजार मतदान होते. यात श्री. राणे यांचे नेतृत्व, मंत्री चव्हाण यांच्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यातून योजनांचा लाभ व त्यातून वाढलेले मतदान यामुळे लोकसभेला राणे यांना ७५ हजारांचे मतदान झाले आहे. भाजपाचे निष्ठावंत, कार्यकर्ते मतदान करत आहेत. विधानसभेला साधारण २० ते २५ हजार मतदान हे नेहमीच हलते राहिले आहे. त्यावर जय-पराजय ठरतो. आमचे भाजपाचे मतदार कुठेही गेलेले नाहीत. महायुती असते तेव्हा काही वेळा मतांचे स्थित्यंतर होते, हे या निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे विधानसभा जिंकण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नेते देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षे मेरा बूथ सबसे मजबूत, शत प्रतिशत भाजपा, महाविजय २०२४ हे अभियान राबवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही धोरण ठरवू, नियोजन करू, स्ट्रॅटेजी ठरवू. मी सुद्धा सातत्याने जनतेच्या संपर्कात आहे. भविष्यात भाजपाचा उज्ज्वल विजय आहे. ही यशाची नांदी आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. Assembly voting