चिपळुणातील जलदूत शाहनवाज शाह यांचा ५ जून रोजी उपोषणाचा इशारा
रत्नागिरी, ता. 23 : चिपळूण – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणानंतर देशी वृक्ष लागवडीसंदर्भात महामार्ग विभाग तसेच कंत्राटदार कंपनीकडून होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी येथील प्रांत कार्यालयासमोर आत्मक्लेष उपोषण करण्याचा इशारा येथील पर्यावरणप्रेमी, जलदूत शाहनवाज शाह यांनी महामार्ग कार्यकारी अभियंता यांना दिला आहे. Agitation for Tree Plantation
मुळात कोकण प्रभागात शासकीय वनक्षेत्र अत्यल्प आहे. असलेल्या खाजगी जंगलातून परवाना व विनापरवाना मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड़ चालूच आहे. या सोबत रत्नागिरी रायगड जिल्ह्यातून जाणारा मुंबई-गोवा रस्ता व गुहागर-विजापूर रस्त्याचे रुंदीकरण करताना फार मोठ्या प्रमाणात एक तर सिमेंटचे रस्ते बांधले जात आहेत. त्यातच भूजल पातळी वाढवणाऱ्या, तापमान कमी करणाऱ्या, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या स्थानिक प्रजातीच्या जुन्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. याचा विपरीत परिणाम अखंड कोकणात होत आहे व वृक्ष लागवडी करिता आपला विभाग निद्रिस्त आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर ठेकेदारांनी अत्यंत अत्यल्प प्रमाणात साधारण १० टक्के ती सुद्धा परदेशी वृक्ष लागवड केलेली दिसून येत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु केले पासून जर नियमानुरूप वृक्ष लागवड केली गेली असती तर सदरहू वृक्ष आज मोठे झालेले असते. Agitation for Tree Plantation
रस्ता बांधकामाच्या अंदाजपत्रकात वृक्षलागवड करणे त्याची जोपासना करणे या करिताचा खर्च हा नमूद आहे. परंतु वस्तुस्थिती पाहता वृक्ष लागवड झालेली नाही. याचा अर्थ या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा आमचा आरोप आहे. त्यामुळे ४ जून पूर्वी रत्नागिरी-रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा व गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरीत चिपळूण ते पोफळी दरम्यानच्या रस्त्यावर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खड्डे काढून स्थानिक प्रजातीची उंबर, पिपळ, वड, जांभुळ, पळस, ताम्हाणी, कडुलिंब, कदम, करंज, कवठ, कांचन भेंडी, आंबा, फणस जांभूळ अशा प्रकारची रोपे लावावीत. त्यांच्यासाठी जाळ्याची व्यवस्था करण्यात यावी. आतापर्यंत झालेल्या वृक्ष लागवडीचे तातडीने ऑडीट होऊन सबंधितांवर कारवाई करावी अन्यथा दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना घेऊन पर्यावरण दिनी आत्मक्लेष आंदोलन केले जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. Agitation for Tree Plantation