रत्नागिरी, ता. 23 : सातत्याने सायकलिंग संदर्भात प्रबोधन करत विविध स्पर्धा, उपक्रम, रॅली आयोजित करणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने अयोध्येतील श्री राम मंदिर स्थापना व राममूर्ती प्रतिष्ठापना म्हणजे संकल्प ते सिद्धी सोहळ्यानिमित्त सायकल रॅली काढली. मारुती मंदिर ते राम मंदिर या मार्गावर काढलेल्या या रॅलीस अनेक सायकलपट्टू सहभागी झाले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश होता. Spontaneous response to Ratnagiri Cyclist Club’s rally
सियावर रामचंद्र की जय, प्रभू श्रीरामाचा जयजयकार असो, भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा विविध घोषणा देत मारुती मंदिर येथून सकाळी ७ वाजता रॅलीला सुरवात झाली. त्यानंतर आयटीआय, नाचणे, छत्रपतीनगर, साळवी स्टॉप, शिवाजीनगर, मारुती मंदिर, माळनाका, एसटी स्टॅंडमार्गे बाजारपेठेतील श्री राम मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली. भगवे झेंडे सायकलवर झळकले होते. शालेय विद्यार्थीसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रस्त्याने जाताना प्रत्येक ठिकाणी भेटणाऱ्या सर्व व्यक्तींनी सायकलपट्टूंचे कौतुक करत जय श्रीराम जय श्रीराम असे म्हणत प्रतिसाद दिला. तसेच इमारतींमधील रहिवाशांनीही क्लबचे कौतुक केले. राम मंदिर येथे रॅली पोहोचल्यानंतर तेथे मंदिराचे विश्वस्त विनायक हातखंबकर यांनी सर्व सायकलपट्टूंचे स्वागत करून या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. Spontaneous response to Ratnagiri Cyclist Club’s rally