सुमारे ३ हजार महिलांचा समावेश, ग्रामीण भागातील प्रवासी व शालेय मुलांची होणार गैरसोय
गुहागर, ता. 21 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आज (बुधवार दि. २१) ऑगस्ट रोजी होत असलेल्या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून बचतगट महिलांना आमंत्रित करण्यात आले आहे. गुहागर तालुक्यातून सुमारे ३ हजार महिलांसाठी ७१ एसटी बसचे नियोजन गुहागर आगाराने केले आहे. यामुळे नियमित होणाऱ्या वाहतुकीचा मोठा बोजवारा उडणार आहे. ग्रामीण भागातील वस्तीच्या फेऱ्या बंद राहणार असल्याने प्रवाशांसह शालेय मुलांचीही मोठी गैरसोय होणार आहे. 71 bus from Guhagar for the beloved sister ‘Shubharambh’
लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित रत्नागिरीत शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पाच हजार महिलांना एकत्र आणले जाणार असून, या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर देण्यात आली आहे. त्यानुसार, प्रत्येक तालुक्यात तहसिलदारांकडून अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येऊन महिलांना जाण्यासाठी एसटी बस सोडण्यात येणार आहेत. गुहागर तालुक्यातील महिलांसाठी ७१ बस सोडण्याचे निश्चित झाले असून सुमारे ३ हजार महिलांचा समावेश आहे. शुभारंभ कार्यक्रमाला जाणाऱ्या महिलांना बसमध्येच जेवण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गुहागर बसस्थानकातून गाड्या संबंधित गावांमध्ये जाऊन तेथील महिलांना घेऊन रत्नागिरीत जाणार आहेत. 71 bus from Guhagar for the beloved sister ‘Shubharambh’
दिवसभर या बस व्यस्त राहणार असल्याने नियमितच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. गुहागर आगाराकडे सध्या ७३ बस असून तालुका प्रशासनाकडून ७१ बसची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ४० बस गुहागर आगार देणार आहे तर उर्वरित बस दापोली व खेड आगारातून देण्यात येणार आहेत. गुहागर आगारामध्ये अगोदरच गाड्यांची वानवा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वस्तीला जाणाऱ्या गाड्या बंद ठेवण्यात येणार असल्याने प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. याचा गैरफायदा वडापवाले घेणार असून प्रवासी व शालेय मुलांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. 71 bus from Guhagar for the beloved sister ‘Shubharambh’