गुहागर, ता. 14 : गुहागर शहरातील ग्रामदेवतेचे पुजारी असलेले 71 वर्षीय अरुण तथा तात्या गुरव गेली 36 वर्ष ध्वजसेवा करत आहेत. थंडी, पाऊस या मौसमातही सायकलवरुन पहाटे बाहेर पडून शहरातील 8-9 शासकीय कार्यालयात सायकलवरुन जावून ते राष्ट्रध्वज बांधतात. हजाराहून अधिक वेळा त्यांनी राष्ट्रध्वजाची सेवा अत्यानंदाने केली आहे. निवृत्त झाल्यानंतरही ते राष्ट्रध्वज बांधण्याचे काम ते करत आहेत. सुंदर हस्ताक्षरामुळे गुहागरमध्ये सर्वांना परिचित असलेल्या तात्याची ही नवी ओळख आज गुहागर न्यूजच्या माध्यमातून स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने वाचकांना होणार आहे. 36 years of National flag service
गुहागर ग्रामपंचायतीमधील शुध्द आणि सुंदर हस्ताक्षर असणारे लिपिक अशी अरुण तथा तात्या गुरव यांची ओळख सर्वश्रुत आहे. अगदी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्यानंतरही अनेक कागदपत्रे लिहिण्याचे काम केवळ हस्ताक्षर उत्तम असल्याने तात्यांकडे आले. घरपट्टीच्या पावतीपासून ते विविध दाखल्यांवरील तात्यांच्या मोतीदार अक्षराची भुरळ कोणाला पडली नसेल तरच नवल. स्वाभाविकच कोणत्याही मिटींगची मिनिटीस् रजिस्टरमध्ये नोंद करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना तात्या हवे असतात. अशी हस्ताक्षर ओळख असलेले तात्या शासकीय कार्यालयात राष्ट्रध्वज बांधण्यासाठी देखील हवे असतात. निवृत्तीनंतर आजही राष्ट्रध्वजाची ही सेवा तात्या आनंदाने निरंतर करीत आहेत.
36 years of National flag service
ध्वज बांधणे हे वाचायला सोपे शब्द असले तरी ही कला कौशल्याची आणि जोखमीची आहे. सर्व जण ध्वजारोहण करताना सावधानच्या स्थिती उभे असतात. सर्वांच्या नजरा ध्वजास्तंभावरील तिरंग्याकडे असतात. त्यावेळी ध्वजारोहण करणारे मान्यवर, अधिकारी यांनी दोरी ओढली की तिरंगा फडकणे आवश्यक असते. तसे झाले नाही तर सर्वांचीच अडचण असते. उंच ध्वजस्तंभावरील ध्वज फडकला नाही तर तो अपमान समजला जातो. त्याचीही चर्चा होते. इतक्या जोखमीचे काम गेली 36 वर्ष ते करत आहेत. एका कार्यालयात एका वर्षात 3 वेळा स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन या दिवशी ध्वजारोहण होते. हा विचार केला तर ग्रामपंचायत/नगरपंचायत गुहागरमध्ये गेल्या 36 वर्षात 108 वेळा अरुण तथा तात्या गुरव यांनी राष्ट्रध्वज सेवा केली आहे.
गुहागरमध्ये ग्रामपंचायत/ नगरपंचायतीद्वारे गांधी चौकातही ध्वजारोहण केले जाते. शहरात पूर्वी दोन कन्याशाळा होत्या. या शाळेमध्ये ध्वज बांधण्याचे कामही तात्यांच करतात. याशिवाय महावितरण, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक, सार्वजनिक ज्ञानरश्मि वाचनालय, सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयातूनही तात्यांना ध्वज बांधायला बोलावले जाते. काही वर्ष तहसीलदार कार्यालयातही त्यांनी ध्वज बांधला आहे. या सर्व स्थानांचा विचार केला तर गेल्या 36 वर्षात हजाराहून अधिक वेळा त्यांनी राष्ट्रध्वजाची सेवा केली आहे. निवृत्तीनंतरही राष्ट्रध्वजाच्या सेवेचे काम ते अत्यानंदाने आणि विनामुल्य करत आहेत. आज त्यांना निवृत्त होवून 1 तप (12 वर्ष) उलटले तरी या सेवेत खंड पडलेला नाही. आजही पाऊस असो वा कडाक्याची थंडी, तात्या भल्या पहाटे सायकलवरुन बाहेर पडून शहरातील 8-9 शासकीय कार्यालयात सायकलवरुन जावून ते राष्ट्रध्वज बांधतात.
36 years of National flag service
याबाबत गुहागर न्यूजशी बोलताना तात्या म्हणाले की, शिक्षण झाल्यावर मुंबईत 14 वर्ष खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर ओल्ड कस्टम येथील निवडणूक कार्यालयात नोकरीला लागलो. तिथेच ध्वज दोरीला कसा बांधायचा. त्याची गाठ सुटली की ध्वज फडकेल यासाठी लागणारे कौशल्य शिकता आले. दोन वर्ष निवडणूक कार्यालयात नोकरी केल्यानंतर गुहागरला ग्रामपंचायतीत नोकरीची संधी मिळाली. मला ध्वज बांधता येत असल्याने ग्रामपंचायतीचे दोन्ही ध्वज दोरीला बांधण्याचे काम मला येऊ लागले. हळुहळु माझे कौशल्य सर्वांपर्यंत पोचले आणि एक एक करत विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात मला ध्वज बांधण्यासाठी बोलावू लागले.
काम एकाच पध्दतीचे असले तरी प्रत्येक वेळी ते नव्याने करावे लागते. प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहण होऊपर्यंत मनातील धाकधुक आजही कमी होत नाही. परंतु सुदैवाने आजपर्यंत केलेल्या सेवेत कधीही ध्वजाची गाठ अडकल्याचा अनुभव आला नाही. असेही तात्यांनी सांगितले. 36 years of National flag service
भारताच्या ध्वजाची संहिता काय असते, ध्वजाचा आकार किती असतो आदी माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.