शास्त्रीय गायन; कलांगण-स्वराभिषेकचे आयोजन
रत्नागिरी, ता. 30 : कलांगण (मुंबई) आणि स्वराभिषेक (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (ता. १) ‘स्वरस्नेह’ ही शास्त्रीय मैफल रंगणार असून यामध्ये मुंबईतील व रत्नागिरीतील युवा गायक शास्त्रीय गायन सादर करणार आहेत. कलांगण व स्वराभिषेक आयोजित संयुक्त मैफलीचे हे चौथे पुष्प आहे. Youth singers concert
ज्येष्ठ संगीत मार्गदर्शिका, संगीतकार, गायिका व कलांगण संस्थेच्या संस्थापिका सौ. वर्षा भावे आणि रत्नागिरीतील स्वराभिषेक संस्थेच्या संचालिका, शास्त्रीय गायिका सौ. विनया परब यांच्या संकल्पनेतून ‘स्वरस्नेह’ कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे. शास्त्रीय गायन शिकणाऱ्या मुलांना प्रोत्साहन मिळावे, तसेच शास्त्रीय गायनाची गोडी युवा पिढीला लागावी याकरिता दोन्ही संस्थांचे शिष्यवर्ग मुंबई आणि रत्नागिरी येथे ही मैफल सादर करतात. याआधी मुंबई-दादर येथे २ व रत्नागिरीत एका मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. येत्या शनिवारी (१ जून) थिबा पॅलेसजवळील प.पू. गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर सायंकाळी साडेसहा वाजता ‘स्वरस्नेह’ची चौथी मैफल रंगणार आहे. Youth singers concert
यामध्ये ‘कलांगण’चे शिष्य रोहन देशमुख आणि शुची तळवलकर, तसेच ‘स्वराभिषेक’चे शिष्य तन्वी मोरे आणि उत्तरा केळकर शास्त्रीय गायन सादर करतील. त्यांना महेश दामले, मंगेश संवादिनीसाथ, तर केदार लिंगायत, प्रथमेश शहाणे आणि पुष्कर सरपोतदार तबलासाथ करणार आहेत. निवेदन सौ. दीप्ती आगाशे करणार असून राकेश बेर्डे ध्वनिसंयोजनाची बाजू सांभाळणार आहेत. मैफलीच्या निमित्ताने रत्नागिरीतील ज्येष्ठ गायिका, तसेच यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीच्या माजी संचालिका सौ. उज्ज्वला पटवर्धन यांना सन्मानित करण्यात येणार आहे. Youth singers concert