वृषाली आठले
GUHAGAR NEWS : योगशास्त्र ह्या विषयामध्ये Masters तर झालं. आपण योगपंडीत झालो ह्याचा पाच ते दहा मिनिटं खूप आनंद ही झाला. पण त्याक्षणी एक वेगळ्याच जबाबदारीची जाणिव झाली. योग जोपर्यंत पूर्णतः आचरणात आणत नाही तो पर्यंत योगपंडीत होण्याचा पूर्ण आनंद, समाधान मिळणार नाही. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे हा योग स्वतःपुरता न ठेवता माझ्या शिक्षणाचा मूळ उद्देश पुन्हा एकदा आठवला. समाजामध्ये मानसिक आजार इतके वाढले असताना समुपदेशन आणि psychotherapy बरोबरच अजून काय करता येईल ह्याचं उत्तर मिळालं तेव्हा हा शिक्षण प्रपंच… Yoga Shastra
आपण योगशास्त्रात पांडित्य मिळवण्याचा उपयोग एक मानसोपचारतज्ञ म्हणून आपण दुसऱ्याला कसा करून देऊ ह्यावर गेली २ वर्ष नुसता विचारच नाही तर खूप अभ्यास केला. अनेक तज्ञ शिक्षक मार्गदर्शक योगी लाभले. पातंजल योगसूत्र, हठप्रादिपिका, घेरंडसंहिता, योगवसिष्ठ अशा अनेक ग्रंथांची ओळख झाली, तसेच योगदर्शन शास्त्रा बरोबरच सांख्यदर्षन, वैशेषिक दर्शन, न्यायदर्षन अशा अनेक दर्शन शास्त्रांची ओळख व अभ्यास झाला. शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगभर योगाभ्यास आणि अनेक यौगिक क्रियांवर किती यशस्वी प्रयोग झाले आणि म्हणून च त्याचा प्रसार आणि प्रचार जगभर का झाला हे लक्षात आलं.. आणि खूप तीव्रपणे जाणवलं की आत्ता समाजाला पातंजल मुनी ना भारतीय मानसशास्त्रज्ञ का म्हणतात हे समजून घेण्याची गरज आहे. Yoga Shastra
मानसिक आजारामध्ये, मनोविकारामध्ये समुपदेशन आणि औषधोपचार जसे उपचार म्हणून वापरतो तसेच वेगवेगळ्या यौगिक क्रियांचा क्वचित उपचारात्मक आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपयोग होऊ शकतो. ह्यावर काम करणे आवश्यक आहे. पातंजल योगदर्शना मध्ये मनोनियंत्रणाचे मार्ग निर्देशित केले आहेत. जमेल तसे आणि जमेल तेवढे काम करत राहणे. स तु दीर्घकाल नैरन्तर्यसत्कारासेवितो ! Yoga Shastra