रत्नागिरी, ता. 22 : स्वामी रामदेवजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली संचालित पतंजलि योग समिती व परिवार, विधी सेवा प्राधिकरण, जन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दहाव्या जागतिक योग दिन शुक्रवारी सकाळी देसाई बॅंक्वेट्स येथे साजरा करण्यात आला. Yoga Day by Patanjali Family
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश निखिल गोसावी, अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड. भाऊ शेट्ये, महिला पतंजलीच्या संगिता कुलकर्णी, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी अधिवक्ता विद्यानंद जोग आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी म्हणाले की, योग ही फक्त एक दिवस नव्हे तर कायमस्वरूपी करण्याची कृती आहे, योगावर भाषण द्यायला नको. योग शिकूया, करण्याचा प्रयत्न करूया. आज कार्यक्रमानिमित्ताने पतंजली योग परिवाराचे कार्य जाणून घेता आले. जिल्ह्यात त्यांचे चांगल्या प्रकारे काम चालू आहे. Yoga Day by Patanjali Family
यावेळी पतंजलि योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्यानंद जोग यांनी मुख्य न्यायाधीश श्री. गोसावी यांचा सत्कार केला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश निखिल गोसावी म्हणाले की, काम व पैशाच्या मागे लागल्याने सर्वांनाच कामाचा ताण असतो. परंतु योग केल्यास बुद्धी व मनशांती मिळते. स्वतःवर विजय मिळवण्यासाठी प्रत्येकाने योग करावा. माणूस मानसिकदृष्ट्या ताकदवान होतो. प्रणव जोग याने जागतिक योग दिनानिमित्त दिलेल्या योगासन, व्यायाम प्रकार विश्लेषण करून सांगितले व प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांकडून करवून घेतले. त्याला मृण्मयी फडके व हर्षदा दुधाळ यांनीसुद्धा प्रात्यक्षिके सादर केली. यंदा प्रथमच युवा पिढीने सादरीकरण केल्याबद्दल मुख्य न्यायाधीश श्री. गोसावी यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. Yoga Day by Patanjali Family
रा. भा. शिर्के गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी योगशिक्षक राजेश आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, विविध आसनांचे प्रात्यक्षिक दाखवले. किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी भारत सावंत आणि जनशिक्षण संस्थानच्या निधी सावंत यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. या वेळी योग शिक्षक अनंत आगाशे यांनी सूत्रसंचालन केले. अधिवक्ता परिषदेच्या अॅड. प्रिया लोवलेकर यांनी आभार मानले. Yoga Day by Patanjali Family