अरण्यऋषी मारुती चितमपल्लींनी जागवल्या कोकणी निसर्ग व पर्यावरणाच्या आठवणी
धीरज वाटेकर, विलास महाडिक यांनी साधला संवाद
चिपळूण येथील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या कोकणातील राज्य पदाधिकाऱ्यांनी, जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांची सोलापूर येथे भेट घेऊन कोकणी निसर्ग व पर्यावरणाच्या आठवणी जागवल्या. World Environment Day
पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते, लेखक धीरज वाटेकर आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष, चिपळूण तालुक्यात पहिले कृषी पर्यटन केंद्र उभारणारे विलास महाडिक यांनी चितमपल्ली यांच्याशी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘कोकण निसर्ग आणि पर्यावरण’बाबत नुकताच संवाद साधला. यावेळी चितमपल्ली यांना कोकणात मे महिन्यात फुलणाऱ्या कंदवर्गीय फुटबॉल लिली (मे फ्लॉवर)चे फुल आणि रोप, पर्यावरण मंडळाचा शिर्डी पर्यावरण संमेलन ‘वनश्री’ विशेषांक आणि पर्यटन कोकणाचा संशोधित नकाशा भेट देण्यात आला. World Environment Day
कोकणाविषयी, तिथल्या जीवनामानाविषयी, निसर्गाविषयी पहिल्यापासून आजही माझ्या मनात गुढरम्य आकर्षण होतं आणि आहे. वाचनामुळे या आकर्षणाचा विकास झाला. सानेगुरुजी, र. वा. दिघे, गो. नी. दांडेकर आदी कोकणाशी संबंधित लेखकांचे लेखन वाचलेले होते. त्यातून प्रवासी म्हणून कोकणात फिरावं असं नेहमी वाटायचं. गुरु भातखंडे यांच्यामुळे जीवनात सुरुवातीला त्यांच्याच सोबत कोकण फिरण्याची संधी मिळाली, असे यावेळी चितमपल्ली म्हणाले. एनी डॅनिकेन यांनी देवाच्या अस्तित्वाविषयी सहा खंड लिहिलेले आहेत, त्यात कोकणाचा उल्लेख येत असल्याचे चितमपल्ली यांनी सांगितले. चार चौरस किमीचे क्षेत्रफळ असलेले कर्नाळा अभयारण्य हे डॉ. सलीम अली यांचे संशोधन होते. कर्नाळ्यात निसर्ग आणि पर्यावरणाची, पक्ष्यांची योग्य जाणीव असलेल्या वन अधिकाऱ्याची नेमणूक व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. कर्नाळ्यात काही दुर्मीळ पक्ष्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या इच्छेला माझ्या नेमणुकीची जोड मिळाली असावी. सलीम अली दर आठवड्याला मुंबईहून कर्नाळ्याला भेट द्यायचे, अलिबागला जाता-येता थांबायचे. संवाद करायचे. त्यांच्याकडून पक्षी हा विषय शिकायला मिळाला. अनेक नामवंतांच्या ओळखी झाल्या. ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ ही अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी १९५१ मध्ये कायो ब्लॅन्को येथे लिहिलेली कादंबरी वाचल्यापासून जीवनात मत्सकोश लिहावा अशी मनात जिज्ञासा होती. याच जिज्ञासापोटी जीवनात दोनेक वर्षे हर्णेला स्थायिक झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हर्णे बंदरासह कोकणातील निसर्गाच्या आपल्या आठवणी सांगितल्या. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरील वास्तव्यात त्यांनी समुद्री पक्षी तसंच समुद्री जीवांच्या हालचालींचा अभ्यास केला. त्यातून त्यांनी पावसाळ्यापूर्वीचे सृष्टीतील असंख्य आश्चर्यजनक बदल टिपले. पावसाळ्यापूर्वी जंगलातील वातावरणातले अनोखे बदल सूक्ष्म निरीक्षणानंतर जाणवले. पशुपक्ष्यांची अस्वस्थता, त्यांच्या हालचालींवरून येणाऱ्या पावसाच्या अंदाजाचे, तसंच दुष्काळाचे मिळणारे संकेत हे अत्यंत गूढ रहस्य आहे. निबीड अरण्यातील आणि समुद्रकाठानजीकचे माझे अनुभव फार वेगळे आहेत. हवामान खात्यानेही या निरीक्षणांची नोंद घ्यावी एवढे ते महत्त्वाचे असल्याचे चितमपल्ली म्हणाले. World Environment Day
सेवानिवृत्तीनंतर चितमपल्लींनी कोकणात समुद्रकिनाऱ्यावर काळ घालवला. समुद्राचे अथांग विश्व आणि त्यात राहणारे लाखो जीव म्हणजे मानवाला न उलगडणारे निसर्गचक्र आहे. अगदी बारीकसारीक घटनांवर नजर ठेवली तर काही पूर्वसंकेतांची चाहूल मिळते. पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. समुद्रातील माशांमध्ये एकदम खळबळ माजते. त्यांच्या हालचाली अत्यंत गतिमान होऊन ते समुद्रात उंच उडय़ा मारू लागतात. हे चित्र नवीन पिढीने समुद्रकिनाऱ्याशेजारी मुक्काम ठोकून अवश्य निरखावे, असे ते म्हणाले. समुद्रातील प्राण्यांनी अस्वस्थ हालचाली सुरू केल्यानंतर समुद्रातून प्रचंड असे आवाज येऊ लागतात. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. पहिल्या पावसानंतर नदी-नाले, ओढे, तलावांचे पाणी समुद्राला येऊन मिळू लागते तसे मासे त्या पाण्यात उडय़ा मारून प्रवेश करतात आणि प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊ लागतात. डोंगर, पहाडी भागातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्यात ते अंडी घालतात आणि पुन्हा सरळ दिशेने समुद्रात परततात. हे नैसर्गिक जीवनचक्र आहे. World Environment Day
याबाबतीत अत्यंत बारकाईने निरीक्षण केले असता पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा.. उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते. पावसाळ्याच्या सुरुवातीला तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकडय़ांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा विचार करायला हवा. आज पाऊस केव्हा आणि किती पडणार, हे सांगणारी पशुपक्ष्यांच्या प्रजाती आज धोक्यात आल्या आहेत. समुद्रात कित्येक किलोमीटर आत होडी घालून मासेमारी करताना, कोळी बांधवांनीही गरम पाण्यात तांदूळ शिजवून भर समुद्रात, चितमपल्ली शाकाहारी असल्याने त्यांची काळजी घेतली होती. कोकणातील खेकड्यांचे प्रकार, केळशीतील वाळूतलं होरं, मुरूडचे डॉल्फिन त्यांच्या सवयी, आदींसह कोकणाविषयी ते भरभरून बोलले. World Environment Day
कोकण प्रदेशात वन अधिकारी म्हणून पाच वर्षे चितमपल्ली यांनी कर्नाळा अभयारण्यात काम केले. तेव्हा ते अभयारण्य नव्हते. कर्नाळा पक्षी अभयारण्य डॉ. सलिम अली यांच्या पाठपुराव्यातून स्थापन झालं. २० वर्षे डॉ. सलीम आली यांच्या संपर्कात राहायची संधी मिळाली. त्यांचे हस्ताक्षर उत्तम होते. त्यांनीच डायऱ्या लिहायला सांगितल्या. अलिबागच्याजवळ असलेल्या किहीम गावात समुद्रकिनाऱ्यावर त्यांचा बंगला होता. मुंबईहून जाता येता ते कर्नाळ्याला थांबायचे. त्यांनी निसर्ग जगायला शिकवला. ‘माझं जीवन मी तुम्हाला देतो, तुमचं जीवन मला द्या’ असं ते म्हणायचे, असं चितमपल्ली म्हणाले. भारतात सोळा प्रकारची जंगले आहेत. कोकणातील तिवरांची जंगले ही खासगी संपत्ती होता कामा नये. राज्य सरकारने ती आपल्या ताब्यात घेतली पाहिजेत अशी भूमिका पूर्वी मांडल्याचे ते म्हणाले. आजच्या तरुणांना पर्यटनासाठी जंगल आवडत असले तरी संशोधनासाठी रानवाटा तुडवण्याची त्यांची तयारी नाही. जंगलात फिरताना नोंदी घ्यायला हव्यात. प्रयोगशाळा आणि ग्रंथालयांमध्ये बसून वन्यप्राणी, वनस्पतींचे संशोधन होणार नाही. समग्र लिखाणासाठी अनुभवाची शिदोरी लागत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. World Environment Day