प्रभारी सरपंच महेश वेल्हाळ, ग्रामसेवकांच्या व्यस्ततेमुळे अडचण
गुहागर, ता. 07 : पालशेतसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीवर प्रभारी ग्रामसेवकाची नेमणूक पंचायत समिती प्रशासनाने केली आहे. येथील ग्रामसेवकांनी अजुन मासिक सभेची इतिवृत्त लिहिलेली नाहीत. तर ग्रामस्थांच्या पत्रव्यवहाराला उत्तरे कशी मिळणार. ग्रामस्थांनी देखील आरोप करण्यापेक्षा विकासकामांना सहकार्य करावे. कारण ते सांगत असलेली कामे माजी उपसरपंच रवींद्र कानिटकर यांच्या कार्यकाळात बनवलेल्या पंचवार्षिक योजनेतील आहेत. अशी माहिती पालशेतचे प्रभारी सरपंच महेश वेल्हाळ यांनी दिले.
प्रशांत सुर्वे, विनायक गुहागरकर, माजी उपसरपंच रवींद्र कानिटकर आदींनी पालशेत ग्रामपंचायतीच्या कारभारावर टिका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना प्रभारी सरपंच महेश वेल्हाळ म्हणाले की, पालशेत ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कारभाराची अतिरिक्त जबाबदारी क्षीरसागर यांच्यावर आहे. पंचायत समितीकडे केलेल्या पत्रव्यवहाराला उत्तर देण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पालशेत ग्रामपंचायतीकडे माहिती मागविली आहे. मात्र क्षीरसागर यांनी अद्याप ही माहितीच पंचायत समितीला दिलेली नाही. 21 जानेवारीला झालेल्या मासिक सभेचे इतिवृत्तच ग्रामसेवक क्षीरसागर यांनी लिहिलेले नाही. अशा परिस्थितीत पत्रव्यवहाराला उत्तरे कशी द्यायची. हा प्रश्र्न आमच्यासमोर आहे. याच ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत इमारतीच्या दुरुस्तीमध्ये ज्या ठेकेदाराने एकही वस्तू आणली नाही अशा ठेकेदाराला मासिक सभेपूर्वी 1 लाखाचा धनादेश दिला. आमची संमती घेण्यापूर्वीच हे कृत्य ग्रामसेवकांने का केले. त्याच्यावर कोणी दबाव आणला. याची चौकशी झाली पाहिजे.
माजी उपसरपंच आणि मंडळी आक्षेप घेत असलेली विकास कामे 5 वर्षांच्या विकास आराखड्यातील आहेत. पाखाडी आणि रस्त्याच्या कामांसाठी संमतीपत्र घेण्यासाठी मी आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी अनेकवेळा संबंधित जागा मालकांच्या भेटी घेतल्या. मात्र त्यांनी संमतीपत्रे दिली नाहीत. ही मंडळी कोण, त्यांनी संमतीपत्रे का दिली नाहीत. याचाही विचार करण्याची गरज आहे. एकूणच पालशेत गावाचा विकास करायचा असेल तर राजकारण करुन, आरोप करुन काहीच साध्य होणार नाही. त्याऐवजी विकास कामांसाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याची गरज आहे. आम्ही पैसे कमविण्यासाठी ग्रामपंचायतीत आलो नाही. ग्रामपंचायतीचा कारभार स्वच्छ असावा ही आमची देखील इच्छा आहे. परंतू काही जणांचे हेतू साध्य होत नाहीत म्हणून अंतर्गत राजकारण करुन प्रत्येकाला खाली खेचण्याचे उद्योग सुरु आहेत. ग्रामपंचायत सर्वांची आहे. सर्वांनी एकत्र येवून गावाचा विकास करावा असे आवाहन यावेळी प्रभारी सरपंच महेश वेल्हाळ यांनी केले.