ग्रामस्थांचा आरोप, बाहेरील शक्तींच्या दबावाला कंटाळून सरपंचांचा राजीनामा
गुहागर, ता. 7 : सामाजिक पाठिंब्यावर पालशेत ग्रामपंचायतीची सत्ता मिळाली. मात्र त्याचे नियंत्रण दुसरेच लोक मनमानी करत आहेत. म्हणूनच जनतेतून निवडून आलेल्या महिला सरपंचाला राजिनामा द्यावा लागला. असा आरोप प्रशांत सुर्वे, विनायक गुहागरकर, माजी उपसरपंच रवींद्र कानिटकर आदींनी केला आहे. या भोंगळ कारभाराचे पुरावेच त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.
पालशेत ग्रामपंचायतीमध्ये चाललेला भोंगळ कारभार सर्वांसमोर यावा म्हणून प्रशांत सुर्वे, विनायक गुहागकर, यशवंत पालकर, रवींद्र पालशेतकर, रवींद्र कानिटकर, अजित साळवी, दत्तात्रय पाटील आणि अनिल साळवी यांनी पत्रकार परिषद घेतली. यांनी सांगितले की, आमच्याच गावाची बदनामी नको म्हणून आम्ही आजपर्यंत थांबलो होतो. मात्र ग्रामसभा बंद पडल्यापासून पालशेत ग्रामपंचायतीमध्ये मनमानी सुरु झाली आहे. ग्रामपंचायत अधिनियमांमधील तरतुदींपेक्षा सत्तेबाहेरील रिमोट कंट्रोलच्या सुचनांप्रमाणे ग्रामपंचायतीचे काम सुरु आहे. आज ग्रामपंचायत क्षेत्रातील तीन ते चार रस्त्यांची कामे प्रस्ताव परिपूर्ण न केल्याने थांबली. प्रस्ताव बनविताना संबंधित जागामालकांची संमतीपत्रेच जोडली नाहीत. बौध्दवाडीच्या प्रभागातून एकमात्र सदस्य सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडून आला. तेथील 26 नंबरला नोंद असलेल्या रस्त्यासाठी समाजकल्याण खात्यातून 12 लाखाचा निधी मंजूर झाला होता. मात्र ग्रामपंचायतीने कामच केले नाही. हा निधी परत गेला. 14 व्या वित्त आयोगातून काही विकास कामांसाठी त्या कामाला लागणाऱ्या निधीपेक्षा जास्त निधी मंजूर करुन घेण्यात आला आहे. मग त्या निधीतून पुढे त्या प्रभागात आणखी काय काम करणार याची दृष्टी ग्रामपंचायतीकडे नाही.
ग्रामपंचायतीच्या नुतनीकरणासाठी 2 लाख 34 हजार 459 रुपयांचा निधी मंजूर झाला. कामाचे आदेश 17 सप्टेंबर 2019 ला निघाले. 31 डिसेंबर 2019 अंतिम मुदत होती. मात्र सप्टेंबर 2020 मध्ये काम पूर्ण झाले. हे काम निविदा मंजूर झालेल्या ठेकेदाराने केलेच नाही. गावातील अन्य लोकांनी तुकड्यात काम केले. अनेक गोष्टी दर्जाहिन झाल्याने काम पुन्हा करण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली.
कोरोना काळात जनजागृतीसाठी वेगवेगळा खर्च करण्यात आला. पालशेत बाजारपेठेत कमी किंमतीत दर्जेदार मास्क उपलब्ध होते मात्र ग्रामपंचायतीने २० रु. खर्चुन साध्या कापडाचे मास्क घेतले. औषध फवारणीसाठी तीन वार्डात 7450 रु आणि उर्वरित दोन वार्डात 17900 रु. खर्च केले.
या अनागोंदीबद्दल ग्रामपंचायतीकडे विचारणा केली त्याचे उत्तर मिळालेले नाही. म्हणून पंचायत समितीकडे पत्रव्यवहार केला. मात्र महिना उलटून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनीही उत्तर दिलेले नाही. 14 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु आहे. बाहेरील शक्ती सरपंच, सदस्यांना स्वतंत्रपणे कारभार करु देत नाहीत. म्हणून अखेर सौ. स्वरुपा तांबेंनी जनतेतून निवडून येवूनही राजीनामा दिला. असे आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आले.