गुहागर, ता. 19 : रायगड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे पुन्हा एकदा अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र महायुतीच्या उमेदवाराची अजुनही अधिकृत घोषणा झालेली नाही. राष्ट्रवादीतर्फे सुनील तटकरे, भाजपाकडून धैर्यशील पाटील या नावांची चर्चा असतानाच आता भावी खासदार विकास गोगावले असे फलकही झळकु लागलेत. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण याची चर्चा सध्या सुरु आहे. Who is the candidate of Mahayuti
भाजपाकडून खूप आधीपासून रायगड लोकसभेच्या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. डिसेंबरमध्ये गुहागरातील भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या दौऱ्यात पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांची ओळख करुन देण्यात आली. त्यानंतर भाजपाच्या बैठकांच्या शैलीतून धैर्यशील पाटील यांनी गुहागर, दापोली विधानसभा मतदारसंघात छोट्या संपर्क सभा घेतल्या. गुहागर, दापोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी दोन सभा घेतल्या. परंतू या सभेतून आपणच महायुतीचे उमेदवार असल्याचे जाहीरपणे बोलायचे टाळले. रायगड लोकसभेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे लक्षात आल्यावर माणगावमधील ॲड. राजीव साबळे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून आपणही निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले. मात्र ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत शिवसेनेने हात वर केले. परंतू आता महाड परिसरात युवा सेनेच्या माध्यमातून भावी खासदार विकास गोगावले यांचे फलक झळकु लागले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे 3 आमदार असल्याने या लोकसभा मतदारसंघावर आमचाच हक्क असल्याची भूमिका महाड तालुका युवा सेनाध्यक्ष रोहिदास आंबावले यांनी मांडली आहे. Who is the candidate of Mahayuti
रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे 3 (दापोली, महाड व अलिबाग), भारतीय जनता पक्षाचे 1(पेण) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक (श्रीवर्धन) आणि उबाठा शिवसेना 1 (गुहागर) असे आमदार आहेत. पक्षीय बलाबल शिंदे सेनेकडे असले तरी शिवसेनेच्या फुटीनंतर गाव पातळीवर शिंदे सेनेची ताकद किती, अनंत गीते उभे राहील्यावर शिंदे सेनेला मते किती पडतील असा एक प्रवाह आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ श्रीवर्धन विधानसभेने तारले होते. अन्य विधानसभा क्षेत्रात त्यांना मताधिक्यही मिळवता आले नव्हते. त्यातच एकाच घरात 1 खासदार, 1 राज्यमंत्री व 1 आमदार ही चर्चाही तटकरेंसाठी अडचणीची ठरत आहे. रायगड लोकसभेचा पेपर तटकरेंसाठी अवघड असल्याचा शासकीय अहवाल सांगतो. अशावेळी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष या दोन बलस्थानांच्या आधारावर त्यांना तिकीट द्यायचे की विजयाची निश्चितीसाठी खांदेपालट करायचा. या मुद्द्यांवर महायुतीत एकमत झालेले नाही. Who is the candidate of Mahayuti