थेट पंतप्रधान कार्यालयाकडे ग्रामपंचायत तक्रार करणार
गुहागर, ता. 08 : अवघ्या तासभर मुसळधार पडलेल्या पावसाने ऐन गणेशोत्सवाच्या हंगामात, मनिषा कन्स्ट्रक्शनच्या सौजन्याने शृंगारतळी बाजारपेठेत पाणी भरले. काही दुकानांनमध्ये पाणी शिरले. त्यामुळे व्यापारी आणि जनता संतप्त झाली आहे. महामार्गाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने आता याचे व्हिडिओ आणि फोटो थेट मा. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविणार असल्याचे सरपंच संजय पवार यांनी सांगितले. Water in Shringartali market

गुहागर विजापूर महामार्गाचे शृंगारतळीमधील काम अभियांत्रिकीला लाजविणारे आहे. या महामार्गाच्या दुतर्फा असलेली गटारे रिकामी आणि रस्त्यावरुन वहाते नदी अशी परिस्थिती या पावसात दुसऱ्यांदा अनुभवायला मिळाली. ग्लोब इलेक्ट्रॉनिक्ससह आणखी काही दुकानांमध्ये दुसऱ्यांदा पाणी शिरले. बुधवारी (ता. 7) दुपारी 3 वा. सायंकाळसारखी काळोखी करुन एक तास संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाने शृंगारतळी बाजारपेठेतील सर्वांची दाणादाण उडाली. अवघ्या 15 मिनिटात गुहागर विजापूर महामार्गाला नदीचे रुप आले. Water in Shringartali market

सलग दोन वेळा पाणी आल्याने सर्व व्यापारी व जनता वैतागली आहे. या संदर्भात बोलताना पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार म्हणाले की आजपर्यंत ठेकेदार, महामार्गाचे अधिकारी, शासकीय अधिकारी या सर्वांना सांगुन झाले. मात्र कोणीच ठेकेदाराला जाब विचारत नाही. त्यामुळे ठेकेदाराच्या एकूणच कामाचा सर्व अहवाल आता थेट पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेच पाठविण्याचा निर्णय मी घेतला आहे. यामध्ये आधीपासून केलेल्या सर्व पत्रव्यवहार, फोटो आणि व्हिडिओही आम्ही पाठवणार आहोत. इथल्या सर्वसामान्य जनतेचा आणि करदात्या व्यापारी दुकानदारांचा ठेकेदाराकडून होणार छळ आता असह्य झाला आहे. Water in Shringartali market

