गुहागर, ता. 06 : राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्येच निर्माण झालेल्या फुटीचे सावट गुहागर तालुक्यावर पडलेले दिसून येत नाही आमची श्रद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षावरच आहे अशा पद्धतीने येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मत व्यक्त करत असून आणखीन काही दिवसांसाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना – भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांनीहि राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी सहभागी झाल्याने त्यांनाही सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. Wait and Watch in Guhagar NCP
काँग्रेस पक्षामध्ये फूट पडून शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष काढल्यानंतर निष्ठावान राहिलेल्या येथील कार्यकर्त्यांनी आजही आपली निष्ठा कायम ठेवली आहे. राष्ट्रवादीला विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या रूपाने आमदारकीसह मंत्री पद मिळाली. आमदार जाधवांनी राष्ट्रवादी सोडून पुन्हा शिवसेनेजवळ सलगी केली. परंतु गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी एकनिष्ठ राहिली आहे. व्यक्तिनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा अधिक प्रभावी ठरले आहेत. आपला उमेदवार पडला तरी मतदान मात्र 20 टक्क्याने कमी होऊन कायम राहिले आहेत. सध्या गुहागर तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम, खासदार सुनील तटकरे हे अधून मधून येत असतात. पण, शेखर निकम यांच्याकडून कोणताही निधी मिळालेला नाही. तर खा. तटकरे यांच्याकडून अपेक्षित असलेला निधी तालुक्यासाठी मिळालेला नाही. वर इथल्या कार्यकर्त्यांच्या समस्यांकडेहि लक्ष देत नसल्याने राज्यात घडलेल्या घडामोडीवर गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादीवर कोणताच परिणाम झालेला दिसून येत नाही. पदाधिकाऱ्यांनी आणखी काही चार-पाच दिवस वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहण्याचा निर्धार केला आहे. Wait and Watch in Guhagar NCP
आम्ही शरद पवार यांच्याबरोबर
राज्यात घडामोडी घडल्या ह्या दुर्दैवी आहेत तरीसुद्धा आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आणखी पुढील काही चार-पाच दिवस कोणत्या घडामोडी घडतात याकडे लक्ष असून त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ परंतु आम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबरच राहणार आहोत. – श्री. पद्माकर आरेकर, राष्ट्रवादीचे गुहागर तालुकाध्यक्ष
शरद पवार आमचे श्रद्धास्थान
आम्ही काँग्रेस पासून निष्ठावान कार्यकर्ते म्हणून राष्ट्रवादीमध्ये कार्यरत आहोत राष्ट्रवादीचे शरद पवार आमचे श्रद्धास्थान असून अजित पवार हा विश्वास आहे. राज्यात घडलेल्या घडामोडीमुळे गुहागर तालुक्यावर मोठा परिणाम होणार नाही. परंतु पुढील दोन-तीन दिवसांमध्ये पुढील दिशा गुहागर तालुक्याची ठरेल अशा प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिले आहेत. – राजेश बेंडल, माजी नगराध्यक्ष, गुहागर नगरपंचायत
वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करू
राज्याच्या हितासाठी आणि लोककल्याणासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजप – सेना युतीमध्ये सहभागी झाले आहेत. यावर आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार गुहागर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांसोबत घेऊन काम करू एवढेच नव्हे तर येणाऱ्या गुहागर नगरपंचायत सह पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आहे आम्ही एकत्र पण लढू. – श्री. दीपक कनगुटकर, तालुकाध्यक्ष : शिवसेना गुहागर तालुका
सबका साथ, सबका विकास
भारतीय जनता पार्टीची प्रदेश पातळीवर जी भूमिका ठरेल, ती आम्हाला मान्य आहे. त्यानुसार सर्वांना सोबत घेऊन काम करू. सबका साथ, सबका विकास याप्रमाणे गुहागर मतदारसंघात कार्यरत राहू. – श्री. निलेश सुर्वे, तालुकाध्यक्ष : भारतीय जनता पार्टी, गुहागर तालुका
भाजप सोबत जाण्यास घोटाळे कारणीभूत !
सध्या जी वेगवेगळ्या पक्षातील मंडळी भाजपामध्ये दाखल होतायत, ती २०२४ सालात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदींना परत पंतप्रधान पदावर येण्यास सुकर व्हावं यासाठी सुरू आहे. हे जरी दिसत असले तरी आलेल्या मंडळींनी केलेले घोटाळेहि कारणीभूत आहेत. तपास यंत्रणांच शुक्लकाष्ठ कोणाला परवडणारं असतं ?- श्री. उमेश बारटक्के, व्यावसायिक, गुहागर बाजारपेठ
राजकारणाची खिचडी बनलेय
सध्याच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. तत्व, निष्ठा या सर्वांचा विसर पडला आहे. आज इकडे, उद्या तिकडे अशाप्रकारे नेते मंडळी उड्या मारू लागले आहेत. विरोधी पक्षात असताना वाटेल ते आरोप करायचे आणि आपल्या स्वार्थी राजकारणासाठी त्याच पक्षात प्रवेश करायचा, याला जनता आता खरोखरच कंटाळली आहे. यांच्या राजकारणामुळे टीव्हीवरील बातम्या सुद्धा पाहू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकारणाची एकप्रकारे खिचडीच बनली आहे. – श्री. दीपक सांगळे, नागरिक, गुहागर Wait and Watch in Guhagar NCP