गुहागर, ता. 12 : दरवर्षीप्रमाणे मार्च ते जून तसेच गणेशोत्सव काळात नियमितपणे सुरु होणारी मनवेल पाडा (विरार पूर्व) – गुहागर एस.टी. सेवा यावर्षी फक्त दहा दिवसच सुरु राहिली असून सध्या ती पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. Virar-Guhagar bus service closed


उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ग्रामीण भागात जाण्याची प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. मात्र एस.टी. सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना प्रायव्हेट बससेवा वापरण्याशिवाय पर्याय उरत नाही. या खासगी बसेस सीझनमध्ये प्रवासी भाडे सामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारे नसते. एस.टी. महामंडळाची ही गाडी दरवर्षी नफ्यात चालत असून सायंकाळी ७ वाजता सोडण्यात येणारी ही बस नागरिकांसाठी अत्यंत सोयीची ठरते. तरीही यंदा ही सेवा सुरू न केल्यामुळे मुंबई आणि विरार परिसरातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नियमित प्रवासी हेमंत गुरव यांनी एस.टी. महामंडळाकडे त्वरित ही सेवा पुन्हा सुरु करण्याची विनंती केली असून, प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. Virar-Guhagar bus service closed