अकल्पित आघातानंतरही पटवर्धन कुटुंबाचा आदर्श निर्णय
गुहागर, ता.07 : 30 ऑगस्टला गुहागर देवपाट येथील विलास पटवर्धन (वय 65) यांचे अचानक दु:खद निधन झाले. मात्र या आघातानंतरही पटवर्धन कुटुंबाने मनाचा मोठेपणा दाखवत विलास पटवर्धन यांच्या नेत्रांचे दान केले. त्यामुळे कै. विलासच्या दृष्टीने दोन जणांना जग पहाण्याची संधी उपलब्ध झाली. दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही नेत्रदानासारखे पवित्र कार्य करणाऱ्या या कुटुंबांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. Vilas Patwardhan donated an eye

विलास पटवर्धन हे मिश्किल व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वज्ञात होते. सहज गप्पा मारताना चटकन कोटी करण्याचा त्यांचा स्वभाव अपरिचिताला थोडा विचित्र वाटायचा. परंतु एकदा दोस्ती झाली. बोलण्यातला विनोदी ढंग समजला की विलासदादांचा मोकळेपणाही आवडु लागायला. उत्तम ड्रायव्हिंग हा त्यांचा सर्वात मोठा गुण. सर्व प्रकारच्या गाड्या चालवताना कमितकमी इंधन ( चांगले ॲव्हरेजन देणारे) वापरणारे आणि वाहनाची सर्वाधिक काळजी घेणारे चालक म्हणूनही त्यांची ओळख होती. सार्वजनिक जीवनापासून किंचित अंतर ठेवून असणारे विलास काका देवपाटातील गणपती उत्सव, गोकुळाष्टमी यामध्ये मात्र उत्साहाने सहभागी असायचे. अंगावर पडलेली जबाबदारी पूर्ण करणे हाही त्यांचा स्वभाव धर्म. सर्वसामान्यांप्रमाणे चाकोरीबद्ध जीवन ते प्रामाणिकपणे जगले. दुसऱ्याच्या भांडणात पडण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्याचबरोबर लांडीलबाडी करुन स्वार्थ साधण्याचा प्रयत्नही त्यांनी कधी केला नाही. Vilas Patwardhan donated an eye
विलासकाका इतक्या तडकाफडकी सर्वांना सोडून निघुन जातील असे कोणाच्याच ध्यानिमनी नव्हते. परंतु नियतीने त्यांची जीवनरेषा निश्चित केली होती. वयाच्या 65 व्या वर्षी 30 ऑगस्टला हरितालिका पुजनाची गडबड सुरु असतानाच हृदयविकाराच्या तीव्र आघाताने विलासदादांची जीवनज्योत मालवली. कोणताही आजार नसताना, हिंडता फिरता विलासदादा अचानक सर्वांना सोडून गेला. हे पचवणंही अनेकांना जड गेले. कुटुंबावर तर मोठा आघातच होता. एका बाजुला गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना अचानकपणे अकल्पीत घडले होते. यातून सावरणेही अशक्य होते. Vilas Patwardhan donated an eye
याच परिस्थितीमध्ये नेत्रचिकित्सक तंत्रज्ञ दिनेश जोशी एक प्रस्ताव घेवून पटवर्धन कुटुंबियांपर्यंत पोचले. वास्तविक अशा परिस्थितीमध्ये नेत्रदानाचा प्रस्ताव ठेवणे ही अवघडच. डॉ. मंदार आठवले यांना सोबत घेवून डॉ. जोशी घरी पोचले. नेत्रदानाची माहिती आणि महत्त्व सांगितले. त्याही परिस्थितीमध्ये पटवर्धन कुटुंबाने विलासदादांच्या नेत्रदानाला संमत्ती दिली. Vilas Patwardhan donated an eye

तातडीने ही माहिती रत्नागिरीतील लायन्स नेत्रसंकलन केंद्रामध्ये सांगण्यात आली. विलासदादांच्या डोळ्यांमध्ये अँटीबायोटिक औषधे टाकण्यास नेत्रचिकित्सक तंत्रज्ञ दिनेश जोशी यांनी सुरवात केली. नेत्रसंकलन केंद्रातील किशोर सुर्यवंशी यांनी गुहागरला नेत्रसंकलनासाठी जाण्याची परवानगी घेतली. ते योगेश पाटील यांना सोबत घेऊन दुपारी १२.१५ वाजता गुहागर येथे पोहोचले आणि लगेचच १२.४५ वाजता यशस्वीपणे दोन्ही पारपटले (कॉर्निया) काढली. गुहागरचे नेत्रचिकित्सक तंत्रज्ञ दिनेश जोशी आणि पटवर्धन कुटुंबीयांचे लायन्स नेत्रसंकलन केंद्राने कौतुक केले. Vilas Patwardhan donated an eye
या संदर्भात बोलताना नेत्रदान जागरुकता चळवळीचे कार्यकर्ते समीर करमरकर म्हणाले की, या नेत्रदानाचे विशेष महत्व म्हणजे २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या जागतिक नेत्रदान जागरुकता पंधरवड्यामध्ये नेत्रदान झाले. त्यामुळे किमान दोन जणांना दृष्टी प्राप्त होणार आहे. याचा विशेष आनंद आहे. Vilas Patwardhan donated an eye
